नवी दिल्ली - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक राहिलेले भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते तीरथ सिंह रावत (Tirath Singh Rawat) उत्तराखंडचे नवे मुख्यमंत्री आहेत. रावत सध्या आपल्या एका विधानामुळे चर्चेत आले आहेत. एका कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्री रावत यांनी महिला वापरत असलेल्या जीन्सवर विधान केलं असून यामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. "आजकाल महिला फाटलेल्या जीन्स घालून फिरतात, हे सगळं बरोबर आहे का? हे कसले संस्कार आहेत" असं तीरथ सिंह रावत यांनी म्हटलं आहे. Uttarkhand chief minister Tirath Singh Rawat comment on women ripped jeans
मिळालेल्या माहितीनुसार, बाल हक्क संरक्षण आयोगाच्या वतीने एका कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं. याच दरम्यान बोलताना मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत यांनी हे विधान केलं आहे. तसेच मुलांवर होणाऱ्या संस्कारला आईवडील जबाबदार असतात असं देखील ते म्हणाले आहेत. मुख्यमंत्री रावत यांनी त्यांचा प्रवासातील एक अनुभवही सांगितला. "एकदा मी विमानातून प्रवास करत होतो. त्यावेळी मी बघितलं की, एक महिला आपल्या दोन मुलांना घेऊन जवळच बसलेली होती. त्या महिलेने फाटलेली जीन्स घातलेली होती. मी त्या महिलेला विचारलं की कुठे जायचं? यावर ती महिला म्हणाली दिल्लीला."
"महिलेचा पती जेएनयूमध्ये प्राध्यापक आहे आणि ती महिला स्वयंसेवी संस्था चालवते. माझ्या मनात विचार आला, जी महिला एनजीओ चालवते आणि फाटलेली जीन्स घालून फिरते. अशी महिला समाजात कोणत्या संस्कृतीचा प्रसार करत असेल. जेव्हा आम्ही शाळेत होतो, तेव्हा असं नव्हतं" असंही रावत यांनी म्हटलं आहे. तसेच तरुणांमध्येही व्यसन वाढत चाललं आहे. नशेबरोबरच आपल्याला सर्व विकृतींपासून मुलांना दूर ठेवून संस्कारी बनवावं लागेल. तसेच पाश्चिमात्य संस्कृतीच्या प्रभावापासून दूर राहावं लागेल असं देखील रावत यांनी म्हटलं आहे. काही दिवसांवपूर्वी रावत यांनी पंतप्रधान मोदींची तुलना ही प्रभू रामासोबत केली होती. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
उत्तराखंडचा मुख्यमंत्री होईन असा विचार कधी स्वप्नातही केला नव्हता, अशी प्रतिक्रिया तीरथ सिंह रावत Tirath Singh Rawat यांनी निवडीनंतर दिली. 'तुमच्या आशीर्वादामुळे इथपर्यंत पोहोचलो आहे. मी अतिशय लहान गावातून आलो आहे. मुख्यमंत्री होण्याचा विचारदेखील कधी केला नव्हता. माझ्याकडे देण्यात आलेली जबाबदारी तुमच्या सहकार्यानं पूर्ण करेन. राज्याच्या विकासासाठी सर्वांना सोबत घेऊन काम करेन,' असं तीरथ सिंह रावत म्हणाले आहेत.