पुडुच्चेरी : काँग्रेसचे सरचिटणीस आणि माजी केंद्रीय मंत्री व्ही. नारायणस्वामी हे पुडुच्चेरीचे नवे मुख्यमंत्री असणार आहेत. पुडुच्चेरी काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या शनिवारी झालेल्या बैठकीत त्यांचे नाव नेतेपदासाठी निश्चित करण्यात आले. पुडुच्चेरी काँग्रेसचे अध्यक्ष ए. नमशिवायम यांनी मुख्यमंत्रिपदासाठी नारायणस्वामी यांचे नाव सुचवले आणि मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत असलेल्या व्ही. वैद्यलिंगम यांनी त्यांना अनुमोदन दिले. त्यानंतर नारायणस्वामी यांची एकमताने निवड झाली.या बैठकीला दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित व मुकुल वासनिक पर्यवेक्षक म्हणून उपस्थित होते दीक्षित यांनी बैठकीनंतर नारायणस्वामी हे राज्याचे भावी मुख्यमंत्री असतील, अशी घोषणा केली. ही घोषणा होताच नमशिवायम यांच्या समर्थकांनी नारायणस्वामी यांच्याविरोधात जोरदार घोषणा देत अनेक बसची तोडफोड केली. आपण मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत नाही, असे सांगणाऱ्या नारायणस्वामी यांनी स्वत:चे नाव पुढे करून राज्यातील लोकांचा विश्वासघात केल्याचा या काँग्रेस कार्यकर्त्यांचा आरोप होता. तोडफोड आणि हिंसाचारामुळे रस्ते वाहतूक काही काळ ठप्प झाली आणि अनेक प्रवाशांना त्याचा त्रास सहन करावा लागला.या वेळी आसाम आणि केरळ ही राज्ये काँग्रेसच्या हातातून गेली. मात्र पुडुच्चेरीमध्ये या पक्षाला बहुमत मिळाले असून, द्रमुकनेही तिथे काँग्रेसला पाठिंबा देण्याचे ठरवले आहे. नुकत्याच झालेल्या पाच राज्यांच्या निवडणुकीनंतर पश्चिम बंगाल, आसाम, केरळ आणि तामिळनाडू येथे नवे सरकारही स्थापन झाले. मात्र पुडुच्चेरीबाबत काँग्रेस पक्षश्रेष्ठींचा निर्णय होत नव्हता. त्यामुळे अण्णा द्रमुक आणि एन. आर. काँग्रेस या दोन पक्षांच्या नेत्यांनी काँग्रेसच्या कार्यपद्धतीवर टीका केली होती. गांधी घराण्याशी निष्ठा नारायणस्वामी १९८५ पासून पुडुच्चेरीमधून लोकसभेवर अनेकदा निवडून आले. आक्रमक खासदार म्हणून ते तेव्हा ओळखले जात. गांधी घराण्याशी निष्ठा असलेल्या नारायणस्वामी यांनी केंद्र सरकारमध्ये मंत्री म्हणूनही काम केले आहे. ते एकदा राज्यसभेवरही निवडून गेले होते. सध्या ते अ. भा. काँग्रेसचे सरचिटणीस आहेत.
व्ही. नारायणस्वामी पुडुच्चेरीचे मुख्यमंत्री
By admin | Published: May 29, 2016 12:55 AM