ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ८ - वादग्रस्त वक्तव्यांमुळे सतत चर्चेत राहणारे परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री व्ही. के. सिंग यांची जीभ पुन्हा घसरली असून एका ट्विटमध्ये त्यांनी मीडियाला 'Press-titute' म्हटले आहे. सिंग यांच्या या विधानावर सर्व राजकीय पक्षांनी टीका केली आहे. सिंग यांचे हे वक्तव्य अतिशय दुर्दैवी असून ते असंवेदनशील व्यक्ती आहेत, अशी टीका काँग्रेसतर्फे करण्यात आली आहे. पक्षपाती व पूर्वग्रहदूषितपणे वार्तांकन करणा-या प्रेस्टिट्यूटकडून तुम्ही काय अपेक्षा करणार असे ट्विट सिंग यांनी केले आहे.
येमेनमध्ये अडकलेल्या भारतीयांची सुटका करण्याच्या मोहिमेवर असलेल्या सिंग यांनी ' पाकिस्तान दूतावासाच्या भेटीत जो थरार होता, तो या मोहिमेत नाही', असे वक्तव्य सिंग यांनी केले होते. त्यांच्या या वक्तव्यावरून सर्व स्तरातून टीका सुरू असतानाच त्यांनी नवे ट्विट करत आणखी एक वाद ओढवून घेतला. सिंग यांनी मीडियाला 'प्रेस्टिट्यूट' ( वेश्या म्हणजे prostitute या शब्दाची पहिली अक्षरे बदलत त्याऐवजी press हा शब्द वापरून तयार झालेला अपमानकार शब्द) असे म्हटले आहे.
गेल्या महिन्यात पाकिस्तान दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात सिंग सहभागी झाल्यामुळे त्यांच्यावर टीकेची झोड उठवण्यात आली होती. मात्र या सोहळ्यास आपण नाईलाजाने उपस्थित राहिलो होतो, असे त्यांनी म्हटले होते.