नवी दिल्ली : काॅंग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांना गेल्या आठवड्यात लोकसभेतून अपात्र ठरवण्यात आल्यानंतर साेमवारी गृहनिर्माण समितीने त्यांना १२ तुघलक लेन येथील त्यांचा अधिकृत बंगला रिकामा करण्याची नोटीस पाठविली आहे. २००५ पासून ज्या बंगल्यात राहुल गांधी राहत हाेते ताे २२ एप्रिलपर्यंत रिकामा करण्यास सांगण्यात आल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी दिली. २०१९च्या मानहानीच्या खटल्यात सुरत कोर्टाने दोषी ठरवल्याच्या पार्श्वभूमीवर राहुल यांना शुक्रवारी अपात्र घोषित केले हाेते.
काँग्रेस आणि इतर अनेक विरोधी पक्षांच्या खासदारांनी सोमवारी लोकसभेतून राहुल गांधी यांना अपात्र ठरवल्याच्या विरोधात संसद परिसरात निदर्शने करत अदानी समूहाशी संबंधित प्रकरणी संयुक्त संसदीय समिती (जेपीसी) स्थापन करण्याची मागणी केली. यावेळी काँग्रेस आणि इतर काही मित्रपक्षांच्या खासदारांनी काळे कपडे परिधान करून राहुल गांधी यांच्यावरील कारवाईचा निषेध केला.
लोकसभेत गेल्या दोन आठवड्यांप्रमाणे सोमवारी प्रश्नोत्तराचा तास आणि शून्य तासाचे कामकाज होऊ शकले नाही. गदारोळामुळे कामकाज एकवेळ तहकूब केल्यानंतर दुपारी ४.१० वाजताच्या सुमारास दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले. या गदारोळात वित्त विधेयक २०२३ मध्ये राज्यसभेने शिफारस केलेल्या दुरुस्तीला सभागृहाने मंजुरी दिली. राज्यसभेचे कामकाज अवघ्या दहा मिनिटांत दिवसभरासाठी तहकूब झाले.
राज्य विधानसभांमध्ये गदारोळ
देशभरात विविध ठिकाणी काँग्रेसकडून राहुल गांधी यांच्या अपात्रतेप्रकरणी निषेध करण्यात आला. अनेक राज्यांत विधानसभांतही या प्रश्नावरून गदारोळ झाला. काँग्रेस आमदारांनी सोमवारी ओडिशा विधानसभेत ‘काळा दिवस’ पाळला. विरोधी पक्ष द्रविड मुन्नेत्र कळघम (डीएमके) आणि काँग्रेसने पुद्दुचेरी विधानसभेत सभात्याग केला. काँग्रेस आमदारांनी सोमवारी बिहार विधानसभेत हंगामा केला. काँग्रेसचे सर्व आमदार दंडाला काळ्या पट्ट्या बांधून आणि काळे कपडे घालून सभागृहात पोहोचले होते.
सावरकरांचे नाव घेऊ नका काँग्रेस खासदारांचा दबाव
सावरकरांच्या मुद्द्यावरून महाविकास आघाडीतील राजकीय वाद आता मुंबईपासून दिल्लीपर्यंत पोहोचला आहे. संसद भवनात काँग्रेसच्या खासदारांनी ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांना दबक्या आवाजात सांगितले की, राहुल गांधी यांनी सावरकर यांचे नाव न घेणेच महाराष्ट्र काँग्रेसच्या हिताचे ठरेल. याबाबत पक्षांतर्गत चर्चा करू असे आश्वासन सोनिया गांधी यांनी या खासदारांना दिले आहे.
गुजरात विधानसभेतून १६ आमदार निलंबित
निदर्शने करणाऱ्या काँग्रेसच्या १७ पैकी १६ आमदारांना सोमवारी विधानसभेतून अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या उर्वरित कालावधीसाठी २९ मार्चपर्यंत निलंबित करण्यात आले.