हरिश गुप्ता -
नवी दिल्ली : सुमारे देशातील ८० कोटी लोकांना आतापर्यंत कोरोना प्रतिबंधक लस देण्यात आली असून, या महिनाअखेर हा आकडा १०० कोटींच्या घरात गेलेला असेल. त्यामुळे १ ऑक्टोबरपासून १२ ते १७ वयोगटातील मुलांना लसीचा पहिला डोस देण्याची घोषणा केंद्र सरकार लवकरच करेल, असे सांगण्यात येते.
देशात १८ वर्षांखालील मुलांची संख्या सुमारे ४४ कोटी आहे. त्यातील १२ ते १७ या वयोगटातील मुलांना प्राधान्याने लस देण्याची तयारी सरकारने चालवली आहे. इन्सॅकॉग (सार्स व कोविड संबंधीची देशातील सर्वोच्च सरकारी संस्था) व कोविड टास्क फोर्सचे अध्यक्ष प्रा. एन. के अरोरा यांनी सांगितले ही या वयोगटातील मुलांद्वारे कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्यता अधिक असल्याने त्यांना प्राधान्याने लस दिली जाईल. लहान मुलांमध्ये कोरोनाचा फारसा संसर्ग झाला नसल्याचे आतापर्यंतच्या सिरो सर्व्हे मधून आढळून आले आहे. मात्र प्रौंढातील मोठ्या वर्गाचे लसीकरण झाले असल्याने १२ ते १७ या वयांच्या मुलांना आधी लस देण्याचा मानस आहे.
कोणत्या ना कोणत्या व्याधी असलेल्या वा अशा व्याधींची शक्यता असलेल्या मुलांना आधी लस देण्यात येईल, असे प्रा. अरोरा म्हणाले. एका प्रश्नाच्या उत्तरात त्यांनी सांगितले की, एरवीही लहान मुलांमध्ये मोठे आजार व त्यामुळे मृत्यू होण्याचे प्रमाण कमीच असते. त्यामुळे त्यांच्याऐवजी पालकांच्या सुरक्षिततेकडे आधी लक्ष देण्यात आले, त्यांना आधी लस देणे सुरू झाले.
झायकोव-डी लस देणार- देशात १२ ते १७ या वयोगटातील सुमारे १२ कोटी मुले असून, त्यातील जेमतेम १ टक्का मुलांना अन्य व्याधी आहेत. ही संख्या सुमारे ४० लाख असावी, असा सरकारचा होरा आहे. त्यांना ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापासून मोफत लस देण्यास सुरुवात होईल. - औषध महानियंत्रकांनी झायडस कॅडिलाच्या झायकोव-डी लसीच्या आपत्कालीन वापराला २० ऑगस्ट रोजी परवानगी दिली आहे. भारतात १२ वर्षांवरील मुलांना दिली जाणारी ही पहिली लस असेल.