नवी दिल्ली: देशात कोरोनाविरुद्ध लसीकरण मोहीम वेगाने सुरू आहे. या मोहिमेमध्ये, वृद्ध आणि 45 वर्षांवरील लोकांनंतर, 18 वर्षे वय ओलांडलेल्या सर्व लोकांचे लसीकरण केले जात आहे. पण, अद्याप किशोरवयीन आणि 18 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांच्या लसीकरणाची परवानगी देण्यात आलेली नाही. पण, आता लवकरच लहान मुलांनाही कोरोना लस मिळण्याची शक्यता आहे.
लहान मुलांच्या कोविड लसीकरणाबाबत, भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (ICMR) मध्ये कोविड-19 साठी राष्ट्रीय टास्क फोर्सच्या ऑपरेशनल रिसर्च ग्रुपचे डॉ. एन के अरोरा म्हणतात की, देशात एकूण 44 कोटी मुले आहेत. त्यापैकी 12 वर्षाखालील मुलांची संख्या सर्वाधिक आहे. त्याचबरोबर 12 ते 17 वयोगटातील एकूण 12 कोटी मुले आहेत. सध्या झायकोव्ह डी(ZyCoV-D) लसीला या वयोगटातील मुलांना लसीकरणासाठी भारतात मान्यता देण्यात आली आहे. ऑक्टोबर महिन्यात किशोरवयीन मुलांना लस मिळण्याची शक्यता आहे.
लवकरच होईल लसीकरणडॉ.अरोरा पुढे म्हणतात की, ज्याप्रमाणे प्रौढांमध्ये वृद्ध आणि दीर्घकालीन गंभीर आजार असलेल्या रुग्णांना सर्वात आधी लस दिली गेली, त्याचप्रमाणे देशात सर्वात आधी कॉमोरबिड मुलांना कोरोना लस दिली जाईल. 12 ते 17 वर्षे वयोगटातील मुलांमध्येही अशाच प्रकारे प्राधान्य निश्चित केले जाईल. सध्या अनेक लस कंपन्या मुलांसाठी लस बनवण्याबरोबरच चाचण्या घेत आहेत. त्यामुळे 12 कोटी मुलांचे लसीकरण करण्यासाठी जास्त वेळ लागणार नाही.
पुढच्या वर्षी 'या' मुलांचे लसीकरणडॉ.अरोरा म्हणाले की, देशातील 32 कोटी मुले 12 वर्षाखालील आहेत. ज्यात दोन वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मुलांची संख्या मोठी आहे. सध्या दोन वर्षांखालील मुलांना कोरोना लसीकरणात समाविष्ट केले जाणार नाही. भारत बायोटेकसह इतर अनेक लसींच्या चाचण्यांच्या निकालांनंतर ऑक्टोबरपर्यंत किशोरवयीन गटाचे लसीकरण सुरु होईल. तसेच, 2022 च्या जानेवारी ते मार्च दरम्यान दोन वर्ष ते 12 वर्षांच्या मुलांचे लसीकरण सुरू होण्याची अपेक्षा आहे.