कोरोना लसीकरणावरून देशवासियांना लवकरच मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. ऑक्सफर्ड यूनिवर्सिटीसोबत मिळून कोरोना लस उत्पादन करणाऱ्या सिरम इन्स्टिट्यूटचे सीईओ अदार पुनावाला यांनी लसीकरणावर मोठे संकेते दिले आहेत. डिसेंबरच्या शेवटी कोरोना लसीच्या आपत्कालीन लसीकरणाला परवानगी मिळण्याची शक्यता आहे, असे ते म्हणाले.
अदार पुनावाला यांनी एका ग्लोबल बिझनेस समिटला संबोधित करताना ही माहिती दिली. आम्हाला आशा आहे की या महिन्याच्या शेवटी एसआयआयला कोरोना लसीचे लायसन मिळू शकते. मात्र, त्याच्या वापराची मंजुरी नंतर मिळेल. सरकारकडून मंजुरी मिळाल्यानंतर जानेवारी २०२१ पासून भारतात कोरोना लसीकरण अभियान सुरु केले जाईल. सिरम इन्स्टिट्यूट ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि ब्रिटनची अॅस्ट्राझिनेकासोबत मिळून ही लस विकसित करत आहे.
सिरम भारत सरकारसोबतच अन्य बाजारांसाठीही कोरोना लस बनवत आहे. केंद्र सरकारला पुढील वर्षी जुलैपर्यंत ३० ते ४० कोटी डोस खरेदी करायचे आहेत. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या योजनेनुसार देशातील २० ते ३० टक्के लोकसंख्येला कोरोना लस टोचायची आहे. पुढील वर्षी ऑक्टोबरपर्यंत देशातील जास्तीत जास्त लोकसंख्येला कोरोना लस दिली जाणार आहे. तेव्हाच लोकांचे आयुष्य पूर्वीसारखे सामान्य होणार आहे. पुनावाला यांनी सांगितले की, ही कोरोना लस व्यक्तीचे कोरोनापासून संरक्षण करण्याबरोबरच संक्रमण थांबविण्यास सक्षम आहे की नाही ते अद्याप स्पष्ट झालेले नाही. आपल्यालाही याची काहीच कल्पना नाही. देशातील २० टक्के लोकसंख्येला जेव्हा कोरोना लस मिळेल तेव्हाच लोकांमध्ये विश्वास परतेल. पुढील वर्षी सप्टेंबर, ऑक्टोबरमध्ये प्रत्येक व्यक्तीसाठी कोरोना लस उपलब्ध होण्याची आशा त्यांनी व्यक्त केली.
कोरोना लसीसाठी 'या' अॅपवर रजिस्टर करावे लागणारकोरोना व्हायरसची लस लवकरच भारतात दिली जाणार आहे. केंद्राची तातडीने, आपत्कालीन परवानगी मिळविण्यासाठी तीन कंपन्यांनी अर्ज केले आहेत. ब्रिटन, अमेरिका, बहारीन, रशियामध्ये लसीकरणास सुरुवात झाली आहे. यामुळे भारतातही लवकरच लसीकरणाची प्रक्रिया सुरु होण्याची शक्यता आहे. आता ही लस कशी दिली जाणार, कोण कोण लाभार्थी ठरणार, टप्पे, वितरण आदी प्लॅनिंग सुरु असताना अद्याप तारीख निश्चित झालेली नाही. अशावेळी सरकारने लसीकरणासाठी रजिस्ट्रेशन करण्यासाठी एक अॅप विकसित केले आहे, जे लसीकरणावर नजर ठेवणार आहे.
या अॅपचे नाव आहे Co-WIN. हे Co-WIN App मोफत डाऊनलोड करता येणार आहे. मात्र, सध्या हे अॅप गुगल प्लेस्टोअरवर उपलब्ध नाहीय. यामुळे डाऊनलोड करता येणार नाहीय. अशाप्रकारचे अॅप कुठेही आढळल्यास ते डाऊनलोड करू नका. ते फेक असू शकते शिवाय तुमचा डेटा हॅकर्सना मिळू शकतो. केंद्र सरकार या अॅपच्या लाँचची अधिकृत घोषणा करणार आहे. या अॅपबाबतची माहिती केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी दिली आहे.
को-विन अॅपमध्ये लसीकरण प्रक्रियेपासून प्रशासनाचे काम, लसीकरण कर्मचाऱ्यांची तसेच ज्यांना लस द्यायची आहे त्यांची माहिती दिली जाणार आहे. यामध्ये सेल्फ रजिस्ट्रेशनचाही पर्याय असणार आहे. ग्राम पंचायत सरपंच देखील त्याच्या गावातील लोकांच्या लसीकरणासाठी या अॅपद्वारे अर्ज करू शकणार आहे.