नवी दिल्ली - कोरोनाची सुरुवात, तो भयानक काळ, लॉकडाऊन आणि मिशन बिगेन अगेन हे सर्व अनुभवल्यानंतर भारतीयांसह जगभरातील नागरिकांना कोरोनाच्या लसीची कमतरता भासत होती. मात्र, देशातील दोन कंपन्यांनी सुरुवातीच्या काळात कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सीन या लसींची निर्मित्ती करून देशावासीयांना मोठा दिलासा दिला. त्यानतंर, भारत सरकारनेही देशात मोफत लसीकरणाची घोषणा करून, लसीकरणाच्या कामाला गती दिली. त्यामुळे, लस कधी येणार, येथून सुरू झालेला प्रवास आज 100 कोटी लसीकरणापर्यंत पोहोचला आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या लसीकरणाबद्दल मोदींचे आभार मानले आहेत.
देशामध्ये जवळपास गेल्या दीड वर्षांपासून कोरोनाने हाहाकार माजवला होता. आता कोरोनाच्या केसेस कमी झाल्या आहेत आणि लसीकरण मोहीम जोरदार सुरू आहे. आजचा दिवस भारतासाठी अत्यंत महत्वाचा आहे. कारण आज भारताने लसीकरणाता इतिहासच रचला आहे. भारताने कोरोना लसीचा 100 कोटी डोसचा आकडा पार केला. या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी दिल्लीतील RML हॉस्पिटलला भेट देखील देणार आहेत. तर, इकडे देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह देशातील 100 कोटींपेक्षा अधिक जनतेचे आभार मानले आहेत. लसी कधी येणार.. इथून सुरू झालेला आपला प्रवास आज 100 कोटी लसीकरणापर्यंत पोहोचला आहे. कर्णधार नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात भारताने लसीकरणाचं हे कोटींचं शतक पूर्ण केल्याचं फडणवीस यांनी म्हटलं. तसेच, पंतप्रधान नरेंद्र मोदींचेही त्यांनी ट्विटरवरुन आभार मानले आहेत.
आमदार, खासदार, मंत्र्यांनाही उपक्रमात सहभागी होण्याचे आदेश
मेगा आउटरीच योजनेअंतर्गत भाजपने आपले मंत्री, खासदार, आमदार आणि राष्ट्रीय आणि राज्य कार्यकर्त्यांना देशभरातील विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्यास सांगितले आहे. केंद्र सरकार या योजनेतून पुढील वर्षी निवडणुका होणाऱ्या राज्यांवर लक्ष केंद्रित करत आहे. यात राजकीयदृष्ट्या महत्त्वाचे उत्तर प्रदेश, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे गृहराज्य गुजरात आणि पंजाब असेल. योजनेअंतर्गत मंत्री आणि खासदारांसह भाजप नेते लसीकरण केंद्रांना भेट देतील. तिथे डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांचा सन्मान केला जाईल.