लोकमत न्यूज नेटवर्क नवी दिल्ली : आशिया खंडातील चीनचा प्रभाव कमी करण्यासाठी भारत विकसित करीत असलेली लस भारतीयांसोबतच नेपाळमधील आरोग्य सेवकांना देण्यासाठी परराष्ट्र मंत्रालयात बैठकांचे सत्र सुरू आहे. सध्या परराष्ट्र सचिव डाॅ. हर्षवर्धन शृंगला नेपाळच्या दौऱ्यावर आहेत. दोन दिवसांच्या दौऱ्यात गेल्या वर्षभरात मोठ्या प्रमाणावर ताणले गेलेले संबंध दुरूस्त करण्यासाठी संवादावर शृंगला यांचा भर असेल. भारतात कोरोना लसीकरण सुरू होताना नेपाळमध्येही एकाचवेळी ते सुरू करण्यासाठी परराष्ट्र मंत्रालयातील अधिकाऱ्यांमध्ये चर्चा सुरू आहे. तसे झाल्यास त्याचा चांगला परिणाम होण्याची आशा सूत्रांनी व्यक्त केली.
भारताकडून लस घेण्यास नेपाळही अनुकूल आहे. नेपाळमध्येही कोरोनाने कहर केला. आरोग्य व्यवस्था कोलमडली. पर्यटन ठप्प झाल्याने अर्थव्यवस्थेलाही फटका बसला. नेपाळलादेखील कोरोना लसीची अपेक्षा आहे. चीनऐवजी भारताकडून लस घेण्यासाठी नेपाळमधील राज्यकर्ते अनुकूल असल्याचेही निरीक्षण सूत्रांनी नोंदवले. लसीची किंमत, त्यापैकी किती जणांसाठी लस भारताकडून भेट दिली जाईल, हे मात्र अद्याप ठरलेले नाही. भारताने देखील स्वदेशी लस विकसित करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू केले आहेत. ऑक्स्फर्डमध्ये विकसित होणाऱ्या लसीच्या कार्यक्रमात पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट भागीदार आहे. लसीवरील संशोधन पाहता येत्या दोन ते तीन महिन्यात लसीकरण सुरू होण्याची आशा केंद्र सरकारला आहे.