नवी दिल्ली : वय वर्षे १२ ते १४ गटातील मुलांचे कोरोना विषाणूपासून संरक्षण करण्यासाठी लसीकरणाला बुधवारपासून सुरुवात झाली. मुलांना कोर्बेवॅक्स लस दिली जाणार आहे. ६० वर्षे वयाच्या पुढील व्यक्तींना लसीची पूरक मात्रा उपलब्ध व्हावी यासाठी सहआजार (कोमॉर्बेडिटीज) असल्याची अट काढून टाकण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.
केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी ट्वीटरवर म्हटले की, “पंतप्रधान मोदीजी यांच्या नेतृत्वाखालील सबको व्हॅक्सिन मुफ्त व्हॅक्सिनअंतर्गत कोविड-१९ लसीकरण मोहीम पुढे नेण्यासाठी वय वर्षे १२ ते १४ गटातील मुलांचे लसीकरण बुधवारपासून सुरू झाले.” ६० पेक्षा जास्त वयाचे सगळे जण आता आजपासून पूरक मात्रा घेऊ शकतील. १२ ते १४ वयातील मुलांना कोर्बेवॅक्स लसीच्या दोन मात्रा २८ दिवसांच्या अंतराने दिल्या जातील, असे केंद्र सरकारने राज्यांना याबाबत पाठविलेल्या मार्गदर्शक सूचनांत म्हटले आहे.