ग्वाल्हेर: कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरिंएमुळे देशभरातील आरोग्य विभाग सतर्क झाला आहे. दरम्यान, केंद्र सरकारने सर्व राज्य सरकारे आणि अधिकाऱ्यांना आपापल्या भागातील लसीकरण पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहेत. याच क्रमाने मध्य प्रदेशात मोहीम राबवून लोकांचे लसीकरण केले जात आहे. पण, याच लसीकरणावरुन आता ग्वाल्हेरचे जिल्हाधिकारी चर्चेत आले आहेत.
...तर फासावर लटकवेनमंगळवारी जिल्हा दंडाधिकारी कौशलेंद्र विक्रम सिंह यांनी जिल्ह्यातील अधिकाऱ्यंची बैठक घेतली. या बैठकीदरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांना कडक शब्दात धमकी वजा इशारा दिला. 'एकही माणूस सोडला तर मी फासावर लटकवेन. तुम्ही शेतात जा, माणसाचे पाय धरा किंवा त्याच्या घरी जाऊन 24 तास बसा, पण लसीकरणाचे टार्गेट पूर्ण झालेच पाहिजे', असा सज्जड दमच त्यांनी यावेळी अधिकाऱ्यांना दिला.
अधिकाऱ्यांनी सांगितले कारणमिळालेल्या माहितीनुसार, भितरवार तहसीलमध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी अधिकाऱ्यांनी आकडेवारी सादर केली, ही आकडेवारी समाधानकारक नव्हती. त्यामुळे संतप्त झालेल्या जिल्हाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांना ताकीद देत एकही व्यक्ती राहिली तर त्याला फाशी देईन, असे सांगितले.
व्हिडिओ प्रचंड व्हायरलत्यांच्या इशाऱ्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. एनडीटीव्ही या चॅनेलनेही या घटनेचा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे. दुसरीकडे, व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर डीएम म्हणाले की, ओमायक्रॉनचा धोका वाढला आहे. अशा परिस्थितीत गांभीर्य नसलेले कर्मचारी लसीकरणात टाळाटाळ करत आहेत. अशा लोकांना या प्रकरणाचे गांभीर्य समजावे म्हणुनच असा इशारा दिला होता.