लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : फायझर, बायोएनटेक आणि मॉडर्ना या कोरोना प्रतिबंधक लस उत्पादक कंपन्यांना दर मिनिटास एकत्रितरीत्या ६५ हजार डॉलरचा नफा होत असल्याचे एका विश्लेषण अहवालात म्हटले आहे. याचाच अर्थ या कंपन्या प्रत्येक सेकंदाला सुमारे एक हजार डॉलरचा (म्हणजेच ७४,५८० रुपये) नफा कमावित आहेत.
जगभरात कोरोनाच्या साथीने धुमाकूळ घातल्यामुळे या कंपन्यांच्या लसी लोकप्रिय झाल्या आहेत. या कंपन्यांच्या लसींना जगभरात मागणी आहे. तथापि, कंपन्यांनी गरीब देशांना ताटकळत ठेवून श्रीमंत देशांना मोठ्या प्रमाणात लस विकल्या आहेत. त्यातून कंपन्यांना प्रचंड नफा मिळत आहे, असे पीपल्स व्हॅक्सिन अलायन्स (पीव्हीए) या संस्थेने जारी केलेल्या एका अहवालात म्हटले आहे. पीव्हीए ही संस्था सर्वांना लसीचा पुरवठा व्हावा यासाठी काम करीत आहे.
पीव्हीए आफ्रिकाचे संचालक माझा सेयॉम यांनी सांगितले की, अल्प उत्पन्न गटातील देशांत केवळ २ टक्के लसीकरण झालेले असताना काही मोजक्या कंपन्या दर तासाला लक्षावधी डॉलरचा नफा कमावत आहेत. ही बाब बीभत्स आहे. फायझर, बायोएनटेक आणि मॉडर्ना या कंपन्यांनी आपल्या एकाधिकारशाहीचा वापर करून केवळ काही नफा देणाऱ्या संपर्कांना तसेच श्रीमंत देशांनाच लस पुरवठा करण्यास प्राधान्य दिले आहे. फायझर आणि बायोएनटेक या कंपन्यांनी गरीब देशांना एक टक्क्यापेक्षाही कमी लस पुरविली आहे. मॉडर्नाने तर केवळ ०.२ टक्केच लस पुरवठा या देशांना केला आहे.