नवी दिल्ली : ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया अर्थात डीसीजीआयने दोन कोरोना प्रतिबंधात्मक लसींना आपत्कालीन वापरासाठी परवानगी दिली आहे. आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत डीसीजीआयने ही माहिती दिली. डीसीजीआयचे संचालक व्हीजी सोमाणी यांनी सीरमच्या कोविशिल्ड आणि भारत बायोटेकच्या कोवॅक्सिन लसीला आपातकालीन वापरासाठी परवानगी दिली आहे.
शनिवारीच कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन या लसींना सेंट्रल ड्रग्स स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन (CDSCO)च्या कोरोनावरच्या तज्ज्ञ समितीने मान्यता दिली होती. त्यानंतर आता डीसीजीआयकडून परवानगी मिळाली आहे. सोबतच कॅडीलाच्या लसीला तिसऱ्या टप्प्यातल्या क्लिनिकल ट्रायल करायलाही परवानगी देण्यात आली आहे. सीरम आणि भारत बायोटेकच्या या दोन्ही लसी 2 ते 8 डिग्री सेल्सिअस तापमानात ठेवण्यात येऊ शकतात, असे डीसीजीआयने म्हटले आहे. तसेच, थोडा ताप, वेदना आणि अलर्जी असे परिणाम प्रत्येक लसींमध्ये असतात. या दोन्ही लसी ११० टक्के सुरक्षित आहेत, असे व्हीजी सोमाणी यांनी म्हटले आहे.
दरम्यान, आता या दोन्ही लसींच्या निर्धारित आपत्कालीन वापराला परवानगी मिळताच भारतात तातडीने कोरोना लसीकरणाला सुरुवात होणार आहे. पहिल्या टप्प्यातल जवळपास 30 कोटी नागरिकांचे लसीकरण करण्याची केंद्र सरकारची योजना आहे. पहिल्या टप्प्यातील नागरिकांना ही लस मोफत देण्याबाबत केंद्र सरकार सहमत असल्याने त्यापैकी 3 कोटी लोकांना मोफत लस देण्यात येणार आहे अशी माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी माहिती दिली आहे. यामध्ये आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाइन वर्कर्सचा समावेश आहे. त्यानंतर 50 पेक्षा जास्त वयाच्या आणि इतर आजार असलेल्या 27 कोटी लोकांना लस दिली जाणार आहे.