अहमदाबाद- मुली छोटे छोटे कपडे घालून तरुणांना आकर्षित करत असल्यानं छेडछाडीसारख्या घटना घडत असल्याचा आरोप समाजातील काही लोक करत असतात. परंतु गुजरातमधल्या बडोद्यामध्ये पोलीस आयुक्तांनी नव वर्षाच्या पार्टीमध्ये तरुणींना छोटे, तोकडे कपडे घालण्यास मज्जाव केला आहे. तसेच मुलगा आणि मुलगी आक्षेपार्ह परिस्थितीत सापडल्यास पोलीस त्यांना अटकही करू शकतात.
नववर्षाच्या निमित्तानं अनेक ठिकाणी पार्टी आयोजित केल्या जातात. त्याच पार्श्वभूमीवर बडोद्यातील तरुणींना पोलिसांनी इशारा दिला आहे. छोटे आणि तोकडे कपडे घालून रस्त्यावर फिरताना कोणतीही तरुणी आढळल्यास पोलीस तिच्यावर कारवाई करणार आहेत. पोलीस आयुक्त अनुपम सिंह गहलोत यांनी याबाबत एक परिपत्रकही जारी केलं आहे. या परिपत्रकात तरुणींनी छोटे आणि तोकडे कपडे न घाल्याचा सल्ला देण्यात आला आहे. गुजरातमधली सांस्कृतिकनगरी असं नामाभिधान असलेल्या बडोद्यातील आयुक्तांनी तरुणींना तोकडे आणि अंगाला तंग असणारे कपडे घालून 31 डिसेंबरच्या पार्टीमध्ये सहभागी न होण्याचा इशारा दिला आहे. अशा प्रकारचे कपडे घालून पार्टीमध्ये एखादी तरुणी आढळल्यास पोलीस तिच्यावर कारवाई करणार आहेत.इतकंच नव्हे, तर तरुण-तरुणी आक्षेपार्ह परिस्थितीत आढळल्यास त्यांना तुरुंगाची हवा खावी लागणार आहे. पोलिसांनी पार्टीच्या आयोजकांना हॉटेल, पार्टी प्लॉट आणि रेस्टॉरंटमध्ये न्यू ईअर पार्टीच्या ठिकाणी सीसीटीव्ही लावण्याचे आदेश दिले आहेत. जेणेकरून नववर्षाच्या कार्यक्रमांवर नजर ठेवता येणार आहे. दुसरीकडे मुलींसाठी शाळा, कॉलेज, मंदिर आणि नीट परीक्षेसाठी ड्रेस कोड ठरवून देण्यात आला आहे. त्यामुळे या ड्रेस कोडला बडोद्यातून विरोध होण्याची शक्यता आहे.