बडोदा : दोन दिवसांपासून सुरु असलेल्या पावसाचा फटका गुजरातला बसला आहे. राज्यातील वलसाड, सुरत आणि नवसरी जिल्ह्यात पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. प्रमुख शहरांमध्ये ठिकठिकाणी रस्त्यांवर पाणी तुंबल्याने वाहतूक कोंडी झाल्याचे दिसून आले. तर, पावसामुळे झालेल्या रस्त्यावरील खड्ड्यात बडोदा महानगरपालिकेच्या महापौरांचीच गाडी अडकल्याचेही वृत्त समोर आले आहे.
गेल्या दोन दिवसांपूर्वी बडोदा शहरात पावसाने चांगलीच हजेरी लावली होती. यावेळी बडोद्याच्या महापौर डॉ. जिगिशा सेठ यांची गाडी पावसामुळे रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यात अडकली. या घटनेचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. त्यानंतर महापौरांचीच गाडी अडकल्याने शहरातील पावसामुळे पडलेल्या रस्त्यांवरील खड्ड्यांवरुन जोरदार टीका सुरु झाली आहे. महापौरांची गाडी अडकल्याची घटना गेल्या सोमवारी (दि. 25) घडली.
दरम्यान, गेल्या 30 तीस तासात गुजरातमधील वलसाड जिल्ह्यात 550 मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे. तसेच, पावसामुळे येथील स्थानिक प्रशासनाला सतर्कतेचा इशारा देण्यात आला होता, असे जिल्हाधिकारी सी. आर. खारसान यांनी सांगितले.