नवी दिल्ली : भाजप सूडाचे राजकारण करीत नाही आणि रॉबर्ट वड्रा जमीन सौद्याच्या चौकशीतही सूडाचे राजकारण नाही, असे केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंग यांनी म्हटले आहे. हरियाणा सरकारने या प्रकरणी न्यायालयीन चौकशीचे आदेश देत असताना राजनाथसिंग यांनी हे वक्तव्य केले आहे.पत्रकारांशी बोलताना राजनाथसिंग म्हणाले, आम्ही सूडाचे राजकारण करीत नाही, असे आश्वासन मी देशवासीयांना देऊ इच्छितो. आम्ही सर्वांना सोबत घेऊन चालू इच्छितो आणि प्रत्येकाचा विकास सुनिश्चित करू इच्छितो.हरियाणा सरकारने गुरुवारी एक आयोग गठित केला होता. हा आयोग गुडगावच्या सेक्टर-८३ मधील व्यावसायिक कॉलनीच्या विकासासाठी रॉबर्ट वड्रा यांच्या कंपनीसह अन्य काही विकासकांना परवाना देण्याच्या प्रकरणाची चौकशी करील. दिल्ली उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश एस.एन. धिंग्रा यांना या न्यायिक चौकशी आयोगाचे अध्यक्ष बनविण्यात आले आहे. जर हरियाणा सरकार पूर्वाश्रमीच्या काँग्रेस सरकारच्या काळात झालेल्या जमीन सौद्यांची चौकशी करू इच्छित असेल तर त्यात सूडभावना असण्याचा प्रश्नच कुठे येतो, असे केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नकवी यांनी म्हटले आहे. वड्रा असो वा अन्य कुणी. कुणीही कायद्यापेक्षा मोठा नाही. जमीन सौद्यात घोटाळा झाला हे साऱ्या देशालाच ठाऊक आहे. काँग्रेस सरकारने क्लीन चीट दिल्यानंतर जर हरियाणा सरकार या सौद्यात झालेल्या लुटीची पुन्हा चौकशी करीत असेल तर त्यात सूडभावनेच्या कारवाईचा प्रश्नच उद्भवत नाही, असे नकवी म्हणाले.
वड्रा जमीन सौद्याच्या चौकशीत सूडाचे राजकारण नाही
By admin | Published: May 16, 2015 2:13 AM