ऑनलाइन टीम
जम्मू, दि. ४ - देशातील असंख्य भाविकांसाठी वैष्णोदेवीचे दर्शन घेणे आता अधिक सुकर झाले आहे. वैष्णोदेवीच्या पायथ्याशी जाणा-या उधमपूर ते कटरा रेल्वेमार्गाचे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्धाटन झाले. पंतप्रधानांनी शुक्रवारी सकाळी १० वाजता रियासी जिल्ह्यात कटरा रेल्वे स्टेशनवर या गाडीला हिरवा झेंडा दाखवला. यावेळी रेल्वेमंत्री सदानंद गौडा, जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला, यांच्यासह रेल्वे अधिकारीही उपस्थित होते.
ही रेल्वेसेवा वैष्णोदेवीच्या भक्तांसाठी भेट असल्याचे नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले. जम्मू-काश्मीरसाठी आजचा दिवस नवी गती आणि ऊर्जा देणारा असल्याचे सांगत ही रेल्वे म्हणजे विकासाची जननी असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
दरम्यान, या रेल्वेमार्गामुळे काँग्रेसप्रणीत संपुआ सरकारच्या काळातील रेल्वे विस्ताराच्या महत्वाकांक्षी संकल्पाचा एक टप्पा पूर्ण झाला आहे. संपुआच्या कार्यकाळात ११३२ कोटी रुपये खर्चून हा २५ कि.मीचा रेल्वेमार्ग बांधण्यात आला. बिकट परिस्थितीवर मात करून सात लहान बोगदे व ३०पेक्षाही जास्त लहान-मोठ्या पुलांच्या निर्मितीतून हा विस्तारित मार्ग साकारण्यात आला आहे.