बदरपूर – वैष्णवी देवी दर्शनावेळी नागरिकांनी केलेल्या चेंगराचेंगरीत १२ जणांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेत २४ वर्षीय सोनू पांडे यालाही जीव गमवावा लागला. सोनूच्या जाण्यानं त्याच्या कुटुंबात शोककळा पसरली. अलीकडेच सोनूचं लग्न झालं होतं. सोनूच्या मृत्यूमुळे नवविवाहित असलेली पत्नी दिव्या हिच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला. आता पुढे काय करायचं? असा प्रश्न निर्माण झाला. मात्र आता करिअरकडे लक्ष केंद्रीत करणार असून अर्धवट राहिलेले शिक्षण पूर्ण करणार असा विश्वास सोनूची पत्नी दिव्यानं व्यक्त केला.
दिव्यानं सांगितले की, सध्या तिने BSC ची अंतिम परीक्षा दिली आहे. मी माझं करिअर बनवावं अशी सोनूची इच्छा होती आता त्यांचे हे स्वप्न मी पूर्ण करणार आहे. लॉकडाऊनवेळी सोनू आणि दिव्याचं लग्न झालं होतं. सोनूचे वडील म्हणाले की, दिव्याच्या शिक्षणामुळे लग्नानंतरही ती दिल्लीत राहत होती. लग्नानंतर केवळ १ आठवडा ती आजमगडला सासरी आली होती. नोव्हेंबरमध्ये एका नातेवाईकाच्या घरी दोघं भेटले होते. लग्न झाल्यानंतर केवळ दोनदाच सोनू आणि दिव्या एकमेकांना भेटले. परंतु आता सगळी स्वप्न मोडली आहेत. मला दिव्याची चिंता आहे. आता ती माझी सून नव्हे तर मुलगी आहे असं त्यांनी सांगितले.
फरिदाबादच्या एका खासगी कंपनीत काम करणाऱ्या नरेंद्रनाथ यांना बोलताना अश्रू अनावर झाले. जे काम माझ्या मुलाने करायला हवं ते आता मुलासाठी मला करावं लागणार आहे. नातवाच्या मृत्यूनंतर ९५ वर्षीय आजोबांना मोठा धक्का बसला आहे. नरेंद्रची एक मुलगी मीणा आहे. सोनूच्या जाण्यानं सर्व गावकऱ्यांमध्ये भयाण शांतता पसरली आहे.
तर दुसरीकडे विनय कुमार यांचाही चेंगराचेंगरीत मृत्यू झाला आहे. विनय कुमार लेफ्टनंट बनायचं होतं. त्यासाठी वैष्णवी देवीचा आशीर्वाद घेण्यासाठी तो गेला होता. मुलाच्या मृत्यूनंतर महेश चंद आणि भाऊ जसवंत सिंह यांनी पोलिसांच्या निष्काळजीपणामुळे मृत्यू झाल्याचा आरोप केला आहे. गर्दी होत असतानाही भाविकांना अडवण्यात आले नाही. त्यामुळे गोंधळ झाला. विनय कुमार सैन्यात भरती होण्यासाठी प्रयत्न करत होता. मात्र त्याचे स्वप्न अर्धवट राहिले. शनिवारी रात्री उशिरा विनय कुमारचा मृतदेह त्याच्या घरी आणण्यात आला. तेव्हा छातीपासून चेहऱ्यापर्यंत त्याचा मृतदेह निळसर पडला होता. त्याच्या नाकातून आणि कानातून रक्त वाहिले होते.