नवी दिल्ली : सध्या एप्रिल ते मार्च असे असलेले सरकारी व्यवहारांचे वित्तीय वर्ष बदलून ते जानेवारी ते डिसेंबर असे करण्यावर सरकार विचार करीत असले तरी हा बदल निदान सन २०१८ पासून तरी होणार नाही, असे केंद्रीय वित्त राज्यमंत्री संतोष कुमार गंगवार यांनी स्पष्ट केले.एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत गंगवार म्हणाले की, जानेवारी २०१८ पासून नवे वित्तीय वर्ष सुरु करायचे असेल तर सरकारला नोव्हेंबरमध्ये अर्थसंकल्प मांडावा लागेल. पण अर्थसंकल्पाची प्रक्रिया वेळकाढू असते व ती बरीच आधीपासून सुरु करावी लागत असल्याने आता ते शक्य होणार नाही.सरकारमध्ये सध्या या विषयावर चर्चा सुरु आहे, हे खरे. पण सध्याचे वित्तीय वर्ष येत्या मार्चमध्येच संपणार आहे, असे धरून चाला, असेही ते म्हणाले. वित्तमंत्री अरुण जेटली यांनी याचे सूतोवाच केल्यापासून हा बदल नक्की केव्हापासून होईल याविषयी तर्कवितर्क सुरु होते. सरकारी पातळीवरून नक्की काही न सांगता फक्त ‘विचार सुरु आहे’, असेच सांगितले जात होते. नाही म्हणायला मोदी सरकारने याच्या सोबतच उल्लेख केला गेलेला एक बदल अंमलात आणला आहे.
वित्तीय वर्षात बदल लगेच नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2017 2:12 AM