नवी दिल्ली - भारताचे माजी क्रिकेटपटू आणि पंजाबचे मंत्री नवज्योत सिंह सिद्धूच्या पाकिस्तान दौऱ्यामुळे सुरू झालेला वाद अद्याप शमलेला नाही. दरम्यान, सिद्धु यांनी इम्रान खानच्या शपथविधीला लावलेली उपस्थिती आणि पाकिस्तानी लष्करप्रमुख कमर जावेद बाजवा यांच्या घेतलेल्या गळाभेटीबाबत प्रतिक्रिया दिली आहे. माझा पाकिस्तान दौरा राजकीय नव्हता. मी जे केले आहे ते वाजपेयी आणि मोदींनी आधीच केले आहे. "कारगिल युद्धानंतर वाजपेयी यांनी परवेझ मुशर्रफ यांच्याशी चर्चा केली होती. तर नरेंद्र मोदींनी कोणतेही आमंत्रण नसताना नवाझ शरीफ यांच्या कौटुंबिक कार्यक्रमात उपस्थिती लावली होती." असे सिद्धू म्हणाले.
तसेच बाजवा यांच्याशी घेतलेल्या गळाभेटीबाबतही सिद्धू यांनी प्रतिक्रिया दिली. "इम्रान खान यांच्या शपथविधीदरम्यान मी बाजवा यांना भेटलो. त्यावेळी खूप उत्साहाने ते मला भेटले, गळाभेट घेतली. तसेच गुरुनानक यांच्या 500 व्या प्रकाश वर्ष दिवशी भारतातील डेरा बाबा नामक येथून पाकिस्तानमध्ये अडीच किमी अंतरावर करतारपूर साहब येथे भाविकांना थेट प्रवेश दिला जावा यासाठी प्रयत्न करून. आम्हालाही शांतता हवी आहे. एकंदरीत बाजवा यांचे बोलणे मला भावनात्मक वाटले."असे सिद्धू म्हणाले.
यावेळी इम्रान खान यांच्या नव्या सरकारकडून सिद्धू यांनी अपेक्षाही व्यक्त केल्या. ते म्हणाले, "फाळणीनंतर दोन्ही देशांमधील संबंध सुधरू शकले नाहीत. हे दोन्ही देशांचे दुर्दैव आहे. दोन्हीकडे कटुता कायम आहे. असा कडवटपणा दोन्हीकडच्या करोडो लोकांसाठी शाप आहे. आज त्या देशात ज्याप्रकारे दहशतवाद्यांचे संघठन झाले आहे ते पाहता पाकिस्तानचे भविष्य संकटात असल्याचे वाटते. त्यामुळे अशा परिस्थितीत एक दृढनिश्चयी नेता आणि त्याचे सरकारच काही तरी करू शकेल.