ऑनलाइन लोकमत
अहमदाबाद, दि.11 - कारगिल युद्धाच्या वेळी 1999 साली भारतीय लष्कर पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून आक्रमण करण्याच्या तयारीत होते, मात्र आंतरराष्ट्रीय पातळीवरील वाढता दबाव लक्षात घेऊन तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी लष्काराला रोखले होते, असा गौप्यस्फोट माजी लष्करप्रमुख व्ही.पी. मलिका यांनी केला आहे. अहमदाबाद येथील एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी हा गौप्यस्फोट केला आहे. यावेळी भारतीय जवानांनी सप्टेंबर महिन्यामध्ये पाकव्याप काश्मीरमध्ये केलेल्या सर्जिकल स्ट्राईकचे कौतुक करत त्यांनी लष्कराच्या कारवाईचे समर्थनही केले. सर्जिकल स्ट्राईकनंतर, भारताविरोधात दहशतवादी कारवाया करणा-या पाकिस्तानवर दबाव निर्माण करण्यासाठी देशाला आता आंतरराष्ट्रीय पातळीवर विनंती करावी लागणार नाही, असेही त्यांनी म्हटले आहे.
पाकिस्तान असाच वागत राहिला तर, आम्हाला युद्ध करावे लागेल, असा इशारा पाकिस्तानला देण्याची गरज असल्याचेही मलिक यांनी सांगितले. यावेळी भारत आणि पाकिस्तानमधील ताणलेल्या संबंधासंदर्भात मलिक यांना प्रश्न विचारण्यात आले, त्यावेळी एक सर्जिकल स्ट्राईक केल्यानंतर पाकिस्तान सुधारेल, असे वाटत नाही, आपण त्यांच्या कृतीला प्रत्युत्तर देण्यासाठी अधिक तयार राहिले पाहिजे, असे उत्तर त्यांनी दिले. तसेच सर्जिकल स्ट्राईकचा पुरावा मागण्यावर भाजप आणि विरोधी पक्षांमध्ये सुरू असलेल्या राजकारणावरही त्यांनी टीका केली आहे. देशाच्या सुरक्षेप्रश्नी आपण सर्वांनी एकत्र काम केले पाहिज, तसंच राजकारण्यांना देशाच्या सुरक्षेबाबत ज्ञान नसल्याने त्यांनी बोलणे टाळावे, असे मलिक यांनी सांगितले.
आणखी बातम्या
यावेळी बोलताना, 1999 सालच्या कारगिल युद्धावेळचे काही अनुभव त्यांनी सांगितले. 2 जून रोजी पाकिस्तानवर आक्रमण करण्यापासून अटलबिहारी वाजपेयींनी रोखल्यामुळे खूप नाराज झालो होतो. पाकिस्तानवर आक्रमण न करण्यासंदर्भात दिवसभरात तीन बैठका घेण्यात आल्यानंतर वाजपेयींनी माझे मन वळवले, अशी माहिती मलिक यांनी दिली. तत्कालीन राष्ट्रीय संरक्षण सल्लागार ब्रजेश मिश्रा यांनी एका मुलाखतीदरम्यान म्हटले देखील होते की, 'आम्ही आज नियंत्रण रेषा ओलांडली नाही, मात्र उद्याचे आम्हाला आम्हाला माहित नाही'. भारतावरील आंतरराष्ट्रीय पातळीवरील दबाव, त्याकाळी असलेल्या निवडणुका, अशी अनेक कारणे हा निर्णय घेण्यामागे होती. मात्र वाजपेयी यांनी घेतलेला निर्णय किती योग्य होता,ते समजते, असे देखील मलिक यांनी मान्य केले.