व्हॅलेंटाईन डे-३
By admin | Published: February 14, 2015 11:51 PM
कौटुंबिक वातावरण
कौटुंबिक वातावरण शहरातील उद्यानांमध्ये आज प्रेमीयुगुलांऐवजी संपूर्ण कुटुंबासह आलेल्यांची संख्या अधिक होती. सेमिनरी हिल्स, तेलंगखेडी, अंबाझरी आदी उद्यानातच एरवी आढळून येणाऱ्या प्रेमीयुगुलांची संख्या आज कमी होती. त्याऐवजी कुटुंबासह उद्यानात हजेरी लावणारे अधिक होते. पती-पत्नी आपल्या चिमुकल्यांना घेऊन उद्यानात आले होते. अनेकांनी तर आपल्यासोबत जेवणाचे डबे आणले होते. हिरव्यागार गवतावर बसून कुटुंबासह भोजनाचा आस्वाद घेताना अनेक कुटुंबीय आढळून आले. तर मोठे व्यक्ती भोजन करीत असताना उद्यानातील खेळण्यांवर बालक मनसोक्त खेळत होती. बहुतांश उद्यानांमध्ये असेच वातावरण होते. बालोद्यानात आज पोलिसांचा कडा पहारा असल्याने हैदोस घालणारे फिरकलेच नाही. त्यामुळे उद्यानात येणाऱ्यांमध्ये कुठलीही भीती नव्हती. आजच्या दिवशी प्रेमीयुगुलांपेक्षा कुटुंबासह येणाऱ्यांची संख्याच अधिक असल्याचे बालोद्यानमध्ये पार्किंगचा व्यवसाय करणारे साहिल खान यांनी सांगितले. -गुंडगिरीने व्यवसाय बुडाला चार-पाच वर्षांपूर्वी व्हॅलेंटाईन डेला विरोध मोठ्या प्रमाणावर होत होता. परंतु नंतर ते बंद झाले. आता पुन्हा आक्रमकता वाढली आहे. शुक्रवारी अचानक काही तरुणांनी येऊन उद्यानात हैदोस घातला. काही तरुणींची छेडही काढली. ही कुठली संस्कृती आली. यामुळे आमच्यासारख्या लोकांचा व्यवसाय मात्र बुडाला आहे. व्हॅलेंटाईन डेला चांगली गर्दी असते. त्यामुळे पार्किंगमधून व खाद्यपदार्थांच्या विक्रीतून चांगली कमाई होते. मात्र कालच्या गुंडागर्दीच्या प्रकरणामुळे उद्यानामध्ये आज फारसे लोक फिरकलेच नाही. त्यामुळे व्यवसाय बुडाला असल्याचे बॉटनिकल गार्डनमधील पार्किंग चालक पिंटू शहाकार यांनी सांगितले.