अहमदाबाद - चहा स्टॉल आणि प्रसिद्ध कॅफे मालकांकडून व्हॅलेंटाईन डेसाठी भन्नाट आयडिया आणि पॅकेज देण्यात येत आहे. यंदाचा व्हॅलेंटाईन आपल्या प्रियसोबत साजरा करण्यासाठी गुजरातमध्ये कॅफे चालकांनी ऑफर दिल्या आहेत. तर, अहमदाबादमधील एका कॅफे चालकाने तर चक्क मोफत चहा देण्याची घोषणा केली आहे. मात्र, एमबीए चायवाला नावाने प्रसिद्ध असलेल्या प्रफुल्ल बिल्लोरे यांनी फेसबुकवर याबाबतचे पेजही तयार केले आहे.
'MBA Mr. बिल्लोरे अहमदाबाद चायवाला' या कॅफेमालकाने व्हॅलेंटाईन डे दिवशी संध्याकाळी 7 ते 10 या वेळेत सिंगल लोकांसाठी मोफत चहा देण्याची घोषणा केली आहे. अहमदाबादच्या वस्त्रापूर येथे प्रफुल्ल बिल्लोरे याचे चहाचे दुकान आहे. 25 जून रोजी प्रफुल्ल यांनी रस्त्यावरच या चहाच्या दुकानाची सुरूवात केली होती. केवळ 8 हजार रुपयांच्या भाग भांडवलावर हा चहाचा स्टॉल सुरू करण्यात आला होता. त्यावेळी, कुटुंबीय आणि नातेवाईंनी अनेक टोमणे मारले होते. मात्र, दोन वर्षांच्या मेहनतीनंतर प्रफुल्ल यांचे एमबीए चायवाला हे चहाचे दुकान अत्यंत फेमस बनले आहे. तर आता, या चहाच्या स्टॉलचे रुपांतर एक कॅफेमध्ये झाले असून येथे चहासोबत स्नॅक्सही मिळतो.
व्हॅलेंटाईन वीकची सुरुवात होताच, सर्वच गिफ्ट शॉफी, कॅफे आणि रेस्टॉरंटकडून कपल्ससाठी ऑफर्स दिल्या जातात. मात्र, सिंगल तरुणांना कुणीही ऑफर देत नाही, सिंगल लोकांची कुणालाही काळजी नाही. त्यामुळे मी व्हॅलेंटाईन डे दिवशी सिंगल असणाऱ्या तरुण आणि तरुणींसाठी मोफत चहा देण्याची कल्पना मला सुचली. त्यानुसार मी ही कल्पना यंदाच्या व्हॅलेंटाईन डेपासून अमलात आणणार असल्याचं 22 वर्षीय प्रफुल्ल याने म्हटले. मात्र, सिंगल कोण हे कसे ओळखणार याबाबत प्रफुल्लने म्हटले की, तसं ओळखण कठीण आहे. त्यामुळे जो कोणी सिंगल म्हणून कॅफ शॉपला येईल, त्यास चहा मोफत दिला जाईल. तर, ही गर्दी आटोक्यात राहावी म्हणूनच सायंकाळी 7 ते 10 या वेळेतच ही सुविधा सवलत देण्यात आली आहे. दरम्यान, एमबीए चायवाला प्रफुल्लच्या कॅफेत 35 वेगवेगळ्या प्रकारचा चहा आणि स्नॅक्स मिळतो. त्यामध्ये, बनमस्का, मॅगी, ब्रेड बटर, सँडवीच, फ्रेंच फ्राईस या पदार्थांचा समावेश आहे.