ऋषिराज तायडे, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : भारतात १६ एप्रिल १८५३ रोजी मुंबई ते ठाणे पहिली रेल्वे धावली. तेव्हापासून मागील १७० वर्षांमध्ये भारतीय रेल्वेत आमूलाग्र बदल झालेत; परंतु ‘वंदे भारत’ रेल्वेमुळे देशातील रेल्वेचा खऱ्या अर्थाने चेहरा बदलला. पारंपरिक रेल्वेच्या तुलनेत पूर्णतः ‘मेक इन इंडिया’ डिझाइन व बांधणी केलेल्या ‘वंदे भारत’ने भारतीय प्रवाशांना सेमी हायस्पीड रेल्वेचा अनुभव दिला.
किती ताकदीचे आहे इंजिन?
कोणतीही रेल्वे म्हटली की, स्वतंत्र लोकोमोटिव्ह इंजिन जोडावे लागते. त्यातही घाट किंवा चढण असलेल्या भागात अतिरिक्त इंजिन जोडण्याची वेळ येते. त्यात बराचसा वेळही जातो. परंतु ‘वंदे भारत’ एक्स्प्रेसमध्येच शक्तिशाली इंजिन अंतर्भूत असल्याने ते स्वतंत्रपणे जोडण्याची आवश्यकता नाही. ‘वंदे भारत’मध्ये प्रत्येकी ८४० किलोवॅटचे ८ मोटर इंजिन आहे. त्यामुळे ‘वंदे भारत’ची इंजिन क्षमता इतर इंजिनांपेक्षा दीडपट ते दुप्पट आहे.
स्लीपर कोच, वंदे मेट्रो लवकरच
या रेल्वे सेवेला मिळणारा प्रतिसाद लक्षात घेता, लवकरच ‘वंदे भारत’मध्ये स्लीपर कोच सुविधा सुरू होणार आहे. लोकल, मेट्रोच्या धर्तीवर ‘वंदे मेट्रो’ सुरू करण्याचा रेल्वे प्रशासनाचा विचार आहे. १०० किलोमीटर अंतरामधील शहरांदरम्यान ब्रॉडगेज मार्गांवरून ही सेवा सुरू करण्याबाबत रेल्वेमंत्री वैष्णव यांनी भाष्य केले होते.
‘वंदे भारत’ची वैशिष्ट्ये
- अपघाताची तीव्रता रोखण्यासाठी ‘कवच’ प्रणालीचा वापर
- प्रत्येक डब्यात प्रवाशांना माहिती देण्यासाठी ऑडिओ-व्हिज्युअल पॅसेंजर इन्फॉर्मेशन सिस्टिम
- संपूर्णतः स्वयंचलित दरवाजे; संपूर्ण एक्स्प्रेसमध्ये सीलबंद गँगवे
- एक्झिक्युटिव्ह डब्यांमध्ये फिरती आसनव्यवस्था
- प्रत्येक सीटजवळ मोबाइल चार्जिंग सुविधा
- हॉट केस, बॉटल कूलर, हॉट वॉटर बॉयलरसह मिनी पॅन्ट्रीकार
- बायो-व्हॅक्युम श्रेणीतील स्वच्छतागृहे; दिव्यांग प्रवाशांसाठी विशेष सुविधा
- प्रत्येक डब्यात आपत्कालीन खिडक्या, अलार्म पुश बटन, टॉक बॅक युनिट, अग्निशमन यंत्रणा
प्रवाशांचा उत्तम प्रतिसाद
‘वंदे भारत’मध्ये प्रवाशांना दर्जेदार प्रवासी सुविधा दिली जाते. मध्य रेल्वेवरील सर्वच ‘वंदे भारत’ला प्रवाशांचा प्रतिसाद मिळत असून अनेक फेऱ्या ९० टक्क्यांहून अधिक भारमानासह धावत आहे.- प्रवीण पाटील, वरिष्ठ जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे