Vande Bharat Express: देशभरात आजच्या घडीला वंदे भारत एक्स्प्रेसची क्रेझ पाहायला मिळत आहे. संपूर्ण देशात सध्या ३४ मार्गांवर वंदे भारत एक्स्प्रेस सुरू आहेत. यातच नव्या रंगसंगतीत असलेली वंदे भारत सेवेत दाखल झाली आहे. नवी केशरी रंगातील वंदे भारत ट्रेन पाहण्यासाठी प्रवासी गर्दी करताना दिसत आहेत. यातच आता एक नवीन सेवेचा शुभारंभ करण्यात आला आहे. या सुविधेचे लोकार्पण रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी केले.
मिळालेल्या माहितीनुसार, भारतीय रेल्वे ०१ ऑक्टोबरपासून ट्रेनच्या जलद स्वच्छतेसाठी 'मिरॅकल १४ मिनिट्स' ही संकल्पना राबवत आहे. वंदे भारत ट्रेनची साफसफाई आता केवळ १४ मिनिटांत केली जाणार आहे. २९ वंदे भारतमध्ये ही सुविधा सुरू करण्यात आली आहे. ही एक अनोखी संकल्पना भारतीय रेल्वेमध्ये प्रथमच स्वीकारण्यात आली आहे. हा उपक्रम 'मिरॅकल ७ मिनिट्स' संकल्पनेवर आधारित आहे, ओसाका, टोकियो इत्यादी जपानमधील विविध स्थानकांवर, जिथे सर्व बुलेट ट्रेनची स्वच्छता सात मिनिटांत केली जाते आणि ती ट्रेन परतीच्या प्रवासासाठी सज्ज केली जाते. तीच संकल्पना आता भारतीय रेल्वे वंदे भारत ट्रेनपासून राबवणार असल्याची माहिती अश्विनी वैष्णव यांनी दिली.
ट्रेन स्वच्छ करण्यासाठी केवळ १४ मिनिटे लागणार
फ्रंटलाइन कर्मचाऱ्यांची संख्या न वाढवता स्वच्छता कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता, कौशल्ये आणि काम करण्याची पद्धत बदलून ही सेवा शक्य झाली आहे. दिल्ली कॅटॉनमेंटसह वाराणसी, गांधीनगर, म्हैसूर आणि नागपूर या ठिकाणी या नव्या सुविधेचा शुभारंभ करण्यात येत आहे. ही संकल्पना अमलात आणण्यापूर्वी रेल्वेकडून ट्रायल घेण्यात आली. या ट्रायलमध्ये रेल्वे अटेंडंट्सने प्रथम सुमारे २८ मिनिटांत ट्रेन स्वच्छ केली. यानंतर ट्रेनच्या साफसफाईचा कालावधी १८ मिनिटांपर्यंत आला. कोणत्याही नवीन तंत्रज्ञानाचा समावेश न करता ट्रेन स्वच्छ करण्यासाठी आता केवळ १४ मिनिटांचा कालावधी लागणार आहे, अशी माहिती रेल्वे मंत्र्यांकडून देण्यात आली.
दरम्यान, कालांतराने हळूहळू ही संकल्पना इतर रेल्वे सेवांमध्ये लागू अमलात आणली जाणार आहे. भारतीय रेल्वेने सप्टेंबर महिन्याच्या पंधरवड्यात 'स्वच्छता ही सेवा' अभियान सुरू केले. त्याअंतर्गत रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी नवी दिल्लीतील रेल्वे भवन येथून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे रेल्वे अधिकाऱ्यांना स्वच्छतेची शपथ दिली.