Vande Bharat Express Train Rules: वंदे भारत एक्स्प्रेस देशभरात लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. अलीकडेच गोरखपूर आणि लखनऊ या मार्गावर वंदे भारत सुरू करण्यात आली असून, ही देशातील २५ वी वंदे भारत एक्स्प्रेस असल्याचे सांगितले जात आहे. यातील काही वंदे भारत ट्रेनना खूपच चांगला प्रतिसाद मिळत असून, काही मार्गावरील वंदे भारत एक्स्प्रेसकडे प्रवाशांनी पाठ फिरवल्याचे चित्र दिसत आहे. मात्र, वंदे भारत ट्रेनने तुम्ही प्रवास करत असाल, तरी काही नियम लक्षात ठेवणे आवश्यक आहे, अथवा तुम्हाला जेलही होऊ शकते, असे सांगितले जात आहे.
वंदेभारत एक्सप्रेस आता २५ राज्यांमध्ये धावत आहे. नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोरखपूर ते लखनऊ आणि जोधपूर ते अहमदाबाद (साबरमती) या दोन नव्या वंदे भारत एक्स्प्रेसना हिरवा झेंडा दाखविला. महाराष्ट्रात आताच्या घडीला ५ वंदे भारत एक्स्प्रेस सुरू आहेत. सर्वाधिक व्यस्तता असलेल्या वंदे भारत ट्रेनमध्ये कासारगोड ते तिरुवनंतपुरम ट्रेन सर्वोत्तम कामगिरी करणारी वंदे भारत एक्सप्रेस आहे. मात्र, वंदे भारत एक्स्प्रेसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी काही नियम आवर्जून लक्षात ठेवले पाहिजेत, असे म्हटले जात आहे.
वंदे भारत एक्स्प्रेसने प्रवास करताना या ५ गोष्टी ध्यानात घ्या
कन्फर्म तिकीट प्रवाशांनाच वंदे भारत एक्स्प्रेसने प्रवासाची अनुमती आहे. वंदे भारत एक्सप्रेसच्या तिकीट दरात कोणतीच सवलत नाही, पाच वर्षांवरील मुलांना पूर्ण तिकीट लागेल. रेल्वे कर्मचाऱ्यांना त्यांच्या सुविधा पासवर राजधानी आणि शताब्दी सारख्याच सुविधा मिळतील. अस्वच्छता केल्यास प्रवाशाला पाचशे रुपयांचा दंड आणि तुरुंगवास किंवा दोन्ही शिक्षांची तरतूद करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. शिवाय, सुरक्षेसाठी सुरक्षारक्षक तैनात असेल, अशी माहिती देण्यात आली आहे.
दरम्यान, वंदे भारत एक्स्प्रेस ट्रेनचा नवा लूक आता समोर आला आहे.रेल्वेच्या चेन्नईतील ICF फॅक्टरीत २८ वी वंदे भारत ट्रेनची निर्मिती पूर्ण झाली आहे. सध्या वंदे भारत एक्स्प्रेस निळ्या रंगामध्ये उपलब्ध आहे. तर नवीन येणाऱ्या वंदे भारत एक्स्प्रेस या केशरी आणि ग्रे रंगाच्या कॉम्बिनेशनमध्ये दिसून येणार आहे. हा रंग तिरंग्यातील केशरी रंगावरुन प्रेरित होऊन निवडला आहे. प्रवाशांकडून मिळालेल्या फीडबॅकनुसार वंदे भारत एक्स्प्रेसमध्ये एकूण २५ बदल करण्यात आले आहेत, अशी माहिती रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली.