Vande Bharat Sleeper Train: वंदे भारत एक्स्प्रेस ट्रेन ही आताच्या घडीला देशातील लोकप्रिय ट्रेन आहे. आतापर्यंत देशभरात २५ हून अधिक मार्गांवर वंदे भारतची रेल्वेसेवा सुरू आहे. यात आणखी भर पडणार आहे. प्रवाशांच्या प्रतिसादानुसार काही ठिकाणी ८ तर काही ठिकाणी १६ डब्यांच्या वंदे भारत ट्रेन चालवल्या जात आहेत. आताच्या घडीला शताब्दी मार्गांवर वंदे भारत ट्रेन चालवल्या जात आहेत. मात्र, आगामी काळात राजधानी एक्स्प्रेसच्या धर्तीवर, त्या मार्गांवर वंदे भारत एक्स्प्रेस चालवण्याचे रेल्वेचे नियोजन आहे. त्यामुळे स्लीपर वंदे भारत ट्रेन निर्मितीवर भर दिला जात असून, ती कधीपर्यंत सेवेत येईल, याबाबत भारतीय रेल्वेकडून माहिती देण्यात आली आहे.
देशाला लवकरच पहिली स्लीपर वंदे भारत एक्स्प्रेस मिळू शकते, असे म्हटले जात आहे. चेन्नईतील इंटिग्रल कोच फॅक्टरी म्हणजेच ICF चे महाव्यवस्थापक बी.जी. मल्ल्या यांनी सांगितले की, वंदे भारतची स्लीपर आवृत्ती या आर्थिक वर्षात लॉन्च केली जाईल. याशिवाय वंदे मेट्रोही या आर्थिक वर्षात सुरू होणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
जानेवारी २०२४ पर्यंत पहिली वंदे मेट्रो ट्रेन येण्याची अपेक्षा
सध्या स्लीपर वंदे भारत ट्रेन तयार केली जात आहे. मार्च २०२४ पर्यंत याची निर्मिती पूर्ण होऊन ती सेवेत येऊ शकते. यासोबतच वंदे मेट्रोची निर्मितीही सुरू आहे. १२ डब्यांची ही ट्रेन कमी अंतराच्या मार्गावर धावणार आहे. पहिली वंदे मेट्रो ट्रेन जानेवारी २०२४ मध्ये येण्याची अपेक्षा आहे. बिगर वातानुकूलित प्रवाशांसाठी एक ट्रेन यावर्षी ३१ ऑक्टोबरपूर्वी सुरू केली जाईल. ही एक नॉन-एसी पुश-पुल ट्रेन आहे ज्याच्या दोन्ही बाजूला प्रत्येकी एक लोकोमोटिव्ह असेल आणि २२ डबे या ट्रेनला असतील, अशी माहिती देण्यात आली आहे.
दरम्यान, स्लीपर वंदे भारत ट्रेनची निर्मिती ICF मध्ये सुरू आहे. यामध्ये रेल विकास निगम लिमिटेड आणि रशियाच्या TMH समूहाचा समावेश आहे. या संघाने २०० पैकी १२० स्लीपर वंदे भारत निर्मितीसाठी सर्वांत कमी बोली लावली होती. उर्वरित ८० ट्रेन टिटागड वॅगन्स आणि BHEL यांच्या माध्यमातून तयार केल्या जाणार आहे. वंदे भारत स्लीपर ट्रेनचा वेग ताशी १६० किमी असेल. यात ११ एसी थ्री टियर, ४ एसी टू टियर आणि फर्स्ट क्लास एसीचा एक कोच, असे मिळून एकूण १६ डबे असतील. आवश्यकतेनुसार या कोचची संख्या २० किंवा २४ पर्यंत वाढवता येऊ शकते, असे सांगितले जात आहे.