Vande Bharat Express Fare Rate News: कमी अंतराच्या आणि कमी प्रतिसाद मिळणाऱ्या वंदे भारत एक्स्प्रेसच्या तिकीट दाराचा रेल्वे प्रशासन आढावा घेत असून, त्यामुळे या रेल्वेचा प्रवास सर्वसामान्यांच्या आवाक्यात येण्याची शक्यता आहे, असे सूत्रांनी सांगितले.
मिळालेल्या माहितीनुसार, अशा मोजक्या कमी प्रतिसाद मिळणाऱ्या मोजक्या ट्रेन सेवा वगळता रेल्वेच्या बहुतांश सेवा सध्या पूर्ण क्षमतेने चालत आहेत. इंदूर- भोपाळ, भोपाळ- जबलपूर आणि नागपूर-बिलासपूर एक्स्प्रेस यासारख्या वंदे भारत रेल्वे आणि इतर काही या श्रेणीत येण्याची शक्यता आहे, असे सूत्रांनी सांगितले. जून अखेरच्या आकडेवारीनुसार, भोपाळ -इंदूर वंदे भारत सेवेने केवळ २९ टक्के प्रवासी भार नोंदवला, तर इंदूर- भोपाळ वंदे भारत एक्स्प्रेसच्या परतीच्या प्रवासात हीच आकडेवारी केवळ २१ टक्के होती. दोन शहरांमधील प्रवास सुमारे तीन तासांचा आहे आणि एसी चेअर कारच्या तिकिटासाठी ९५० रुपये आणि एक्झिक्युटिव्ह चेअर कारसाठी १५२५ रुपये लागतात.
तिकीट दर कमी केल्यास प्रवासी संख्येत वाढ होण्याची शक्यता
वंदे भारत एक्सप्रेसचा सर्वात लांब प्रवास सुमारे १० तासांचा आहे आणि सर्वांत लहान प्रवास सुमारे तीन तासांचा आहे. सर्व वंदे भारत एक्स्प्रेसमधील प्रवासी सुविधा वाढवण्याचा रेल्वेचा मानस असून, रेल्वेने परिस्थितीचा आढावा घेतला आहे. काही वंदे भारत एक्स्प्रेस दोन ते पाच तासांपर्यंत कमी कालावधीसाठी सेवा देतात. या एक्स्प्रेसचे तिकीट दर कमी केल्यास प्रवासी संख्येत वाढ होऊ शकेल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
नागपूर-बिलासपूर एक्स्प्रेस भाड्याचे पुनरावलोकन
नागपूर-बिलासपूर वंदे भारत एक्स्प्रेस ही दुसरी रेल्वे जिच्या भाड्याचे पुनरावलोकन केले जात आहे, ज्याची सरासरी प्रवासी भार सुमारे ५५ टक्के आहे. या रेल्वेचे एक्झिक्युटिव्ह क्लासचे भाडे २०४५ रुपये आहे, तर चेअर कारचे भाडे १०७५ रुपये आहे. कमी प्रतिसादामुळे या रेल्वेची जागा मे महिन्यात तेजस एक्स्प्रेसने घेतली होती.
सर्वाधिक पसंतीच्या वंदे भारत एक्स्प्रेस कोणत्या?
बहुतेक वंदे भारत एक्स्प्रेस १०० टक्के प्रवाशांसह धावत आहेत, परंतु काहींना अल्प प्रतिसाद आहे. यात सुधारणा करण्यासाठी आवश्यक ते बदल करत असल्याचे रेल्वेने म्हटले आहे. सध्या २४ राज्यांत वंदे भारतची सेवा सुरू आहे. सर्वाधिक व्यस्तता असलेल्या वंदे भारत ट्रेनमध्ये कासारगोड ते तिरुवनंतपुरम ट्रेन सर्वोत्तम कामगिरी करणारी वंदे भारत एक्सप्रेस (१८३ टक्के), तिरुवनंतपुरम ते कासारगोड वंदे भारत ट्रेन (१७६ टक्के), गांधीनगर-मुंबई सेंट्रल वंदे भारत एक्सप्रेस (१३४ टक्के) यांचा समावेश आहे. मुंबई सेंट्रल-गांधीनगर वंदे भारत एक्सप्रेस (१२९ टक्के), वाराणसी-नवी दिल्ली वंदे भारत एक्सप्रेस (१२८ टक्के), नवी दिल्ली-वाराणसी वंदे भारत एक्सप्रेस (१२४ टक्के), डेहराडून-अमृतसर वंदे भारत एक्सप्रेस (१०५ टक्के), मुंबई-सोलापूर वंदे भारत एक्सप्रेस (१११ टक्के), सोलापूर-मुंबई वंदे भारत एक्सप्रेस (१०४ टक्के) ला असा प्रतिसाद आहे.