Vande Bharat Express Train New Look And Color: सध्याच्या घडीला लोकप्रियतेच्या शिखरावर असलेल्या वंदे भारत एक्स्प्रेस ट्रेनचा नवा लूक आता समोर आला आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी यासंदर्भात ट्विट केले असून, नवीन रुपात येणाऱ्या वंदे भारत ट्रेनच्या निर्मितीचा आढावा घेण्यात आला. नवीन लूकसह प्रवाशांच्या सेवेत दाखल होणाऱ्या वंदे भारत ट्रेनचे काही फोटो रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी शेअर केले आहेत. या नव्या वंदे भारत एक्स्प्रेसमध्ये २५ प्रकारचे मोठे बदल करण्यात आले आहेत.
रेल्वे भारत ट्रेनची मोठ्या प्रमाणात निर्मिती केली जात आहे. स्लीपर कोचची सुविधा असलेली वंदे भारत ट्रेन लवकरच येणार आहे. आताच्या घडीला देशभरात २३ वंदे भारत एक्स्प्रेसची सेवा सुरू आहे. रेल्वेच्या चेन्नईतील ICF फॅक्टरीत २८ वी वंदे भारत ट्रेनची निर्मिती पूर्ण झाली आहे. याचा आढावा अश्विनी वैष्णव यांनी घेतला. यावेळी माध्यमांशी बोलताना अश्विनी वैष्णव यांनी वंदे भारत ट्रेनचा नवा लूक तसेच करण्यात आलेल्या बदलांबाबत महत्त्वाची माहिती दिली.
२५ मोठे बदल होणार, सुविधा वाढवल्या!
अश्विनी वैष्णव हे शनिवारी तामिळनाडूमध्ये होते. यावेळी त्यांनी चेन्नईमध्ये असणाऱ्या इंटिग्रेटेड कोच फॅक्टरीला भेट दिली. सध्या वंदे भारत एक्स्प्रेस निळ्या रंगामध्ये उपलब्ध आहे. तर नवीन येणाऱ्या वंदे भारत एक्स्प्रेस या केशरी आणि ग्रे रंगाच्या कॉम्बिनेशनमध्ये दिसून येणार आहे. हा रंग तिरंग्यातील केशरी रंगावरुन प्रेरित होऊन निवडला असल्याचे रेल्वे मंत्र्यांनी स्पष्ट केले. तसेच प्रवाशांकडून मिळालेल्या फीडबॅकनुसार वंदे भारत एक्स्प्रेसमध्ये एकूण २५ बदल करण्यात आले आहेत. यासोबतच नवीन सेफ्टी फीचर अँटी क्लायम्बर्स यावरही काम सुरू असल्याचे रेल्वे मंत्र्यांनी सांगितले. या नव्या वंदे भारत रेल्वेची चाचणी सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे.
दरम्यान, रेल्वेने 'वंदे भारत 'सह सर्व गाड्यांतील एसी चेअर कार (सीसी) व एक्झिक्युटिव्ह क्लासेसच्या (ईसी) भाड्यात २५ टक्क्यांपर्यंत कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. अनुभूती आणि विस्टाडोम डब्यांसह वातानुकूलित आसन सुविधा असलेल्या सर्व रेल्वेच्या एसी चेअर कार व एक्झिक्युटिव्ह क्लासेससाठी ही योजना असेल. गेल्या ३० दिवसांत ज्या गाड्यांतील वरील वर्गांना ५० टक्क्यांहून कमी प्रवासी मिळाले, त्या गाड्यांना ही सवलत त्वरित लागू केली जाणार असून, यात अनुभूती आणि विस्टाडोम डबे असलेल्या गाड्यांचाही समावेश असेल, असे रेल्वे मंडळाच्या एका आदेशात म्हटले आहे.