नवी दिल्ली : रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी शुक्रवारी वंदे भारत ट्रेनबाबत मोठी घोषणा केली. ते म्हणाले की, वंदे भारत ट्रेन जूनपर्यंत सर्व राज्यांना कव्हर करतील. पुढील वर्षाच्या मध्यापर्यंत 200 शहरे वंदे भारतशी जोडण्याचे आमचे ध्येय आहे.
राष्ट्रीय राजधानी दिल्लीतील भाजप मुख्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी हे वक्तव्य केले. ते म्हणाले, भारताची 'वंदे भारत ट्रेन' ही जागतिक दर्जाची ट्रेन बनली आहे, जी ताशी 160-180 किमी वेगाने धावते. अशा ट्रेन तयार करण्याची क्षमता जगातील फक्त 8 देशांमध्ये आहे.
दरम्यान, 2004 ते 2014 हे दशक भारतासाठी हरवलेले दशक असल्याचे सांगत त्यांनी मागील काँग्रेस सरकारवर निशाणा साधला. तसेच, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भारताने बरीच प्रगती केली आणि भारताची अर्थव्यवस्था जगात 5 व्या क्रमांकावर आणली, असे रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले.
याशिवाय, 2026 पर्यंत आपण चौथ्या क्रमांकावर असू आणि 2027-28 मध्ये जगातील पहिल्या तीन अर्थव्यवस्थांपैकी एक असू, असेही रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले. तसेच, ते म्हणाले की, दूरसंचार तंत्रज्ञानासाठी भारत नेहमीच जगावर अवलंबून होता, परंतु आज 'मेड इन इंडिया'मुळे भारताचे तंत्रज्ञान जगातील सर्वात समृद्ध देशांमध्ये निर्यात होत आहे.