नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (२४ सप्टेंबर) देशवासीयांना नऊ वंदे भारत ट्रेन भेट देणार आहेत. पंतप्रधान मोदी दक्षिण मध्य रेल्वेच्या (SCR) दोन सेवांसह नऊ वंदे भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवतील. अधिकृत निवेदनानुसार, पंतप्रधान मोदी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे काचीगुडा-यशवंतपूर आणि विजयवाडा-एमजीआर चेन्नई सेंट्रल मार्गांदरम्यान वंदे भारत ट्रेन सेवेचे उद्घाटन करतील. या कार्यक्रमात केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णवही सहभागी होणार आहेत.
मिळालेल्या माहितीनूसार, काचेगुडा-यशवंतपूर दरम्यानची वंदे भारत ट्रेन सेवा या मार्गावरील इतर गाड्यांच्या तुलनेत सर्वात कमी प्रवास वेळेसह दोन शहरांमधील सर्वात वेगवान ट्रेन असेल. यात ५३० प्रवासी बसण्याची क्षमता आहे. विजयवाडा - एमजीआर चेन्नई सेंट्रल मार्गावरील ट्रेन या मार्गावरील पहिली आणि वेगवान ट्रेन असेल. याशिवाय पश्चिम बंगालला पाटणा-हावडा आणि रांची-हावडा मार्गावर आणि हावडा-कोलकाता या जुळ्या शहरांदरम्यान आणखी दोन वंदे भारत ट्रेन सेवा मिळतील.
पाटणा-झाझा, आसनसोल, बर्दवान, हावडा या मुख्य मार्गावरील ट्रॅक मजबूत करण्याबरोबरच पाटणा-हावडा मार्गावर सेमी-हाय-स्पीड गाड्या चालवण्याची तयारी रेल्वेने सुरू केली आहे. १५ फेब्रुवारी २०१९ रोजी पंतप्रधान मोदींनी नवी दिल्ली ते वाराणसी दरम्यान धावणाऱ्या पहिल्या वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवला होता. चेन्नईतील इंटिग्रल कोच फॅक्टरी (ICF) येथे निर्मित, ट्रेन सेट 'मेक-इन-इंडिया' उपक्रमाचे प्रतीक आहे आणि भारताच्या अभियांत्रिकी पराक्रमाचे प्रदर्शन करते. अधिकार्यांच्या मते, पाटणा-हावडा आणि रांची-हावडा मार्गांसाठी नवीन रेकमध्ये २५ अतिरिक्त वैशिष्ट्ये असतील.
रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मे २०२३ मध्ये वंदे भारत ट्रेन संदर्भात एक महत्वाची घोषणा केली होती. यामध्ये असे म्हटले होते की, फेब्रुवारी मार्च २०२४ पर्यंत देशात एकूण तीन प्रकारच्या वंदे भारत ट्रेन चालवल्या जातील. वंदे भारत गाड्या १०० टक्के भारतीय तंत्रज्ञानाने बनवल्या आहेत, ज्या शताब्दी, राजधानी सारख्या गाड्या बदलण्यासाठी तयार केल्या जात आहेत. ही ट्रेन चेन्नईतील इंटिग्रेटेड कोच फॅक्टरीमध्ये तयार केली जात आहे.
शिक्षण क्षेत्राशी संबंधित ४५०० कोटी रुपयांच्या प्रकल्पांचा शुभारंभ करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी २७ सप्टेंबर रोजी गुजरातला भेट देणार आहेत. याशिवाय ते आदिवासी बहुल छोटा उदयपूर जिल्ह्यातील बोदेली शहरात एका जाहीर सभेला संबोधित करणार आहेत. प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण सचिव विनोद राव म्हणाले, बोडेली येथील मेळाव्याला संबोधित करण्यापूर्वी पंतप्रधान मोदी राज्य सरकारच्या 'मिशन स्कूल ऑफ एक्सलन्स' उपक्रमांतर्गत विविध प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करतील.
मिशन स्कूल ऑफ एक्सलन्स योजनेचा उद्देश शालेय पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करून, नवीन आणि स्मार्ट वर्गखोल्या आणि संगणक प्रयोगशाळा निर्माण करून राज्यातील शिक्षणाचा दर्जा सुधारण्याचे आहे. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये गुजरातमधील अडालज गावात झालेल्या एका कार्यक्रमात ही योजना सुरू करण्यात आली होती. याअंतर्गत राज्य सरकार येत्या पाच वर्षांत १०,००० कोटी रुपये खर्च करून सर्व ३५,१३३ सरकारी आणि ५८४७ अनुदानित शाळांचे अपग्रेडेशन करणार आहे. यावेळी राव म्हणाले की, पंतप्रधान राज्यातील शिक्षण क्षेत्राशी संबंधित इतर अनेक नवीन योजनांचा शुभारंभ करतील ज्यात स्वामी विवेकानंद ज्ञान शक्ती निवासी शाळा, रक्षा शक्ती विद्यालय, मुख्यमंत्री ज्ञान सेतू मेरिट शिष्यवृत्ती आणि मुख्यमंत्री ज्ञान साधना मेरिट यांचा समावेश आहे.