उदयपूर ते आग्रा दरम्यान सुरू करण्यात आलेली वंदे भारत ट्रेन चालवण्यावरून रेल्वे कर्मचाऱ्यांनी जोरदार गोंधळ घातल्याची घटना समोर आली आहे. त्यामुळे आता २ सप्टेंबर रोजी सुरू झालेली ही ट्रेन आता वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. कर्मचाऱ्यांमधील या हाणामारीत मालमत्तेचं नुकसान झालं असून एक कर्मचारी जखमी झाला आहे. सोशल मीडियावर सध्या या घटनेचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.
हा वाद कोटा आणि आग्रा रेल्वे विभागातील कर्मचाऱ्यांमध्ये झाला होता. वंदे भारत ट्रेन चालवण्यावरून लोको पायलट आपापसात भिडले. सुरुवात आधी वादावादीने झाली आणि पुढे काही वेळातच हाणामारी झाली. ट्रेनचे लोके पायलट भिडले आणि गार्डवर हल्ला करण्यात आला. याशिवाय संतप्त कर्मचाऱ्यांनी गार्ड रूमच्या दरवाजाचे कुलूप तोडून केबिनची काच फोडली.
वंदे भारतच्या केबिनचं मोठं नुकसान
या घटनेत लोको पायलट जखमी झाला. तसेच हाणामारीत वंदे भारतच्या केबिनचंही मोठं नुकसान झालं. हा वाद वाढल्यानंतर आता ही बाब रेल्वे बोर्डाच्या निदर्शनास आणून देण्यात आली आहे. पश्चिम मध्य रेल्वे, उत्तर पश्चिम रेल्वे आणि उत्तर रेल्वे या रेल्वेच्या कामकाजात गुंतलेल्या विविध रेल्वे विभागांमधील संघर्षामुळे सेवेच्या सुरळीत कामकाजावर परिणाम होत असल्याचं दिसतं.
सोशल मीडियावर Video व्हायरल
या अंतर्गत वादांमुळे वंदे भारत ट्रेन या मार्गावर अनेकवेळा उशिराने धावत असल्याचं रिपोर्टमध्ये म्हटलं आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर पसरल्यानंतर रेल्वे अधिकाऱ्यांनी या घटनेची दखल घेतली आहे. या भांडणातील सहभागी कर्मचाऱ्यांची ओळख पटवण्याचे काम अधिकारी करत असून त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई केली जाण्याची शक्यता आहे.