Vande Bharat Sadharan Express Train: वंदे भारत एक्स्प्रेस भारतीय रेल्वेची सर्वाधिक लोकप्रिय ट्रेन आहे. यानंतर आता वंदे भारत ट्रेनचे नॉन-एसी व्हर्जन वंदे भारत साधारण एक्स्प्रेस ट्रेन प्रवाशांच्या सेवेत येणार आहे. नवीन वंदे भारत साधारण एक्स्प्रेसची सध्या चाचणी सुरू आहे. लवकरच या ट्रेनचे लोकार्पण केले जाणार असून, सुरुवातीला या वंदे भारत साधारण ट्रेनच्या ५ मार्गांना मंजुरी देण्यात आल्याचे सांगितले जात आहे. यामध्ये मुंबईचा समावेश करण्यात आला असल्याचे समजते.
मध्य रेल्वेच्या वाडी बंदर यार्डमध्ये वंदे भारत साधारण ट्रेन उभी असून, कसारा घाटात येथे चाचणी केली जाणार आहे. वंदे भारत प्रचंड लोकप्रिय झाली असली तरी तिकीट दरांमुळे या ट्रेनला अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याचे पाहायला मिळत आहे. यामुळे आता सर्वसामान्य प्रवाशांसाठी त्याच दर्जाच्या सोयी आणि सुविधांसह कमी किमतीत प्रवास करण्यासाठी ‘वंदे भारत साधारण एक्स्प्रेस’ तयार करण्यात आली आहे. या ट्रेनला पुश-पुल यंत्रणा असलेली दोन इंजिन पुढे आणि मागे लावण्यात आली आहेत. या ट्रेनमध्ये १२ विनावातानुकूलित शयनयान डबे, आठ सामान्य डबे आहेत. केशरी-करडा रंगाची रंगसंगती या ट्रेनला देण्यात आली आहे.
वंदे भारत साधारण एक्स्प्रेसच्या ५ मार्गांना मंजुरी
मिळालेल्या माहितीनुसार, सुरुवातीला वंदे साधरण एक्स्प्रेसच्या पाच मार्गांना मंजुरी देण्यात आली आहे. रेल्वे मंत्रालयाने मंजूर केलेल्या मार्गांवर लवकरच गाड्या चालवल्या जाण्याची शक्यता आहे. यामध्ये पाटणा-नवी दिल्ली, हावडा-नवी दिल्ली, हैदराबाद-नवी दिल्ली, एर्नाकुलम-गुवाहाटी आणि मुंबई-नवी दिल्ली या मार्गांचा समावेश असल्याचे सांगितले जात आहे. देशातील पहिल्या सेमी-हाय स्पीड ट्रेन वंदे भारतच्या धर्तीवर वंदे भारत साधारण ट्रेनची निर्मिती करण्यात आली आहे. पहिली वंदे भारत एक्स्प्रेस फेब्रुवारी २०१९ पासून भारतीय प्रवाशांच्या सेवेत आहे.
दरम्यान, आताच्या घडीला संपूर्ण देशभरात ३४ वंदे भारत ट्रेन चालवल्या जात आहेत. दिवाळीत आणखी ९ मार्गांवर वंदे भारत एक्स्प्रेस सुरू करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. तसेच वंदे भारत ट्रेनचे स्लीपर व्हर्जनही लवकरच सादर केले जाणार आहे.