देशभरात धावणाऱ्या अनेक वंदे भारत ट्रेन रिकाम्या जात असून, काही ट्रेनमधील ८० टक्के जागा भरत नसल्याचे समोर येत असताना वंदे भारतचा नवा मार्ग सुरु होणार आहे. तेलंगणामध्ये काही दिवसांपूर्वी सुरू झालेल्या वंदे भारत ट्रेनला प्रवासी मिळत नसताना आता मुंबई ते गुजरातचे सुरत अशी नवीन ट्रेन सुरु केली जाणार आहे. देशाची आर्थिक राजधानी मुंबई ही गुजरातला जोडण्यासाठी बुलेट ट्रेनचा मार्ग बांधत असताना त्यापूर्वीच वंदे भारत या रॅपिड रेलने मुंबई-गुजरात जोडले जाणार आहे.
गुजरातच्या सुरत ते महाराष्ट्रातील मुंबई अशा मार्गाची वंदे भारत ट्रेनने यशस्वी चाचणी करण्यात आली आहे. यावेळी वंदे भारतचा वेग १३० किमी प्रति तास एवढा होता. ही ट्रेन अहमदाबादहून सुरतला आणण्यात आली होती. यामुळे अहमदाबाद-सुरत-मुंबई की सुरत-मुंबई याबाबत रेल्वे प्रशासन निर्णय घेणार असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
वंदे भारत ट्रेनद्वारे दोन महत्वाची शहरे, धार्मिक स्थळे जोडली जातात. सरासरी या वंदेभारत २५० ते ३०० किमी लांबीचा पल्ला किंवा ३-४ तासांत अंतर कापणाऱ्या आहेत. सध्या गुजरातमध्ये अहमदाबाद ते भुज अशी ट्रेन चालविली जात आहे.
सूरत ते मुंबई या मार्गावर वंदे भारत आणण्यामागे मुख्य कारण हे आहे की या मार्गावर दैंनंदिन प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. व्यापारी लोक सुरतला खरेदीसाठी ये-जा करत असतात. यामुळे या मार्गावर वंदे भारत आणली तर रेल्वेलाही फायदा होणार आहे.