वंदे भारत ट्रेनमुळे भारतीय रेल्वेचा चेहरा मोहरा बदलण्याचा प्रयत्न मोदी सरकारने केला आहे. एका मागोमाग एक, एकाचवेळी अनेक मार्गांवर वंदे भारत ट्रेन सुरु केल्या जात आहेत. या ट्रेनचे भाडे व्हीआयपी ट्रेनपेक्षाही जास्त आहे. सुरुवातीला काही रुटवर सुरु करण्यात आलेली वंदे भारत ही प्रिमिअम ट्रेन आता जवळपास ६६ मार्गांवर सुरु करण्यात आली आहे. परंतू, या ट्रेनचे भाडेच एवढे आहे की ती सर्वांना परवडणारी नसल्याने काही मार्ग हे तोट्यात चालले आहेत.
रेल दुनियाच्या वेबसाईटवर वंदे भारतच्या ट्रेनही माहिती आली होती. यानुसार काही मार्गांवर वंदे भारत एकदम फुल होत आहेत. काही मार्गांवर वंदे भारतला प्रवासीच मिळत नाहीत अशी स्थिती आहे. या ट्रेन पांढरा हत्ती ठरू लागल्या आहेत. भुवनेश्वर-विशाखापट्टणम, टाटानगर-ब्रह्मपूर, रीवा-भोपाळ, कलबुर्गी-बेंगळुरू, उदयपूर-आग्रा/जयपूर, दुर्ग-विशाखापट्टणम, नागपूर-सिकंदराबाद आदी मार्गांवर तर निम्म्यापेक्षा जास्त सीट रिकाम्याच राहू लागल्या आहेत.
देशातील प्रमुख शहरांना, राज्यांना इंटरसिटीसारखे जोडण्याचे काम वंदे भारतने केले आहे. उद्योगधंदे असलेली शहरे, धार्मिक स्थळे असलेली शहरे आदी भाग या वंदे भारतद्वारे जोडण्यात येत आहेत. मुंबई, दिल्ली, कोलकाता, चेन्नई, बेंगळुरू, बनारस, पुणे या शहरांतून या वंदेभारत ये-जा करतात. असे असले तरी यामध्ये विमानासारखी प्रिमिअम सेवा आहे. अगदी मुंबई-पुणे असा वंदेभारतने प्रवास करायचा असल्यास ट्रेन येण्यापूर्वीपण तिकिटे उपलब्ध असतात अशी परिस्थिती आहे. या मार्गावरील वंदे भारत ट्रेन लोकांच्या सोईची आहे, तसेच ती बहुतांश वेळा प्रवाशांनी भरलेली असते.
परंतू, असे ११ मार्ग आहेत जिथे प्रवासीच मिळत नाहीएत. नागपूर ते सिकंदराबाद ट्रेनमध्ये एकूण १३२८ सीट्स आहेत. त्यापैकी बहुतांश वेळा सरासरी १११८ सीट रिकाम्याच असतात. भुवनेश्वर विशाखापट्टनची ट्रेन १०७६ पैकी ९३४ जागा रिकाम्या ठेवून धावत असते. अशीच परिस्थिती इतर ट्रेनची आहे. या ट्रेनना निम्म्या जागाही भरताना नाकीनऊ येत आहेत.