मुंबई : पूर्वी खासदार पंतप्रधान कार्यालयात किंवा रेल्वे मंत्रालायात चिठ्ठी पाठवायचे आणि सांगायचे की अमुक अमुक ट्रेन या स्टेशनला दोन मिनिटं, पाच मिनिटं थांबेल का पाहा. आज वंदे भारत एक्स्प्रेस आपल्याकडे का नाही? कधी येणार? यावर ते चर्चा करतात. पूर्वीचा आणि आत्ताचा हा महत्त्वाचा फरक आहे. वंदे भारत ट्रेन भारताची प्रगती आणि वेग या दोन्हींचे प्रतिबिंब आहे, असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी येथे व्यक्त केले. डबल इंजिन सरकारमुळे महाराष्ट्राच्या प्रगतीचा वेग वाढेल व रोजगाराच्या संधीही लवकरच उपलब्ध होतील, असेही त्यांनी म्हटले.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून सुटणाऱ्या साईनगर शिर्डी आणि सोलापूर या दोन वंदे भारत गाड्यांचे उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते झाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव, केंद्रीय मंत्री नारायण राणे, केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील, रामदास आठवले, विधानसभाध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यावेळी उपस्थित होते.
वाहतूककोंडीला गुड बाय सांताक्रूझ-चेंबूर जोडरस्ता प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील अग्निशामक इमारत ते रजाक जंक्शनपर्यंत उन्नत मार्गाच्या एका मार्गिकेचे आणि बीकेसी ते लालबहादूर शास्त्री उड्डाणपुलाला जोडणाऱ्या मार्गिकेचे पंतप्रधान मोदी यांनी शुक्रवारी उद्घाटन करून हे मार्ग वाहतुकीसाठी खुले केले. यामुळे बीकेसी व कुर्ला भागातील वाहतूककोंडी कमी होणार असून, वाहनचालकांची २५ मिनिटांहून अधिक वेळेची बचत होईल.
बोहरा समाजाशी चार पिढ्यांपासूनचे नाते!मी तुमच्या कुटुंबातीलच एक सदस्य आहे. इथे मी मुख्यमंत्री किंवा पंतप्रधान नाही. बोहरा समाजाशी चार पिढ्यांपासून मी जोडला गेलो आहे, हे माझे भाग्य आहे, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबईतील बोहरा समाजाला साद घातली. अल्जामिया-तुस-सैफियाह शिक्षण संस्थेच्या कॅम्पसचे उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते झाले. संस्थेचे कुलगुरू डॉ. सय्यदन मुफद्दल सैफउद्दीन यांच्याकडून पंतप्रधानांचा विशेष सत्कार करण्यात आला.
महाराष्ट्रात सर्वात मोठे रेल्वे नेटवर्क आहे. महाराष्ट्राला १३,५०० कोटी पहिल्यांदाच रेल्वेसाठी मिळाले आहेत. हे सामान्य लोकांचे सरकार आहे, फक्त केंद्राच्या पाठिंब्यामुळे हे सर्व शक्य झाले. पंतप्रधानांचे पाच ट्रिलियन डॉलर भारतीय अर्थव्यवस्थेचे स्वप्न असून त्यात महाराष्ट्राचा मोठा वाटा असेल. - एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री
भाविक आणि प्रवाशांसाठी दोन्ही वंदे भारत गाड्या मैलाचा दगड ठरतील. यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये प्रथमच महाराष्ट्राला भरघोस निधी मंजूर झाला आहे. वंदे भारतसारख्या वेगवान गाड्या भारतीय रुळांवरून धावतील, अशी कल्पनाही कोणी केली नसेल. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ही किमया आहे. - देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री