वंदे भारत ट्रेनला पुन्हा एकदा फटका बसला आहे. यापूर्वी या ट्रेनवर काही समाजकंटकांकडून दगडफेक करण्यात आली होती. आता, नैसर्गिक आपत्तीचा सामना ट्रेनला करावा लागला. त्यामध्ये काही प्रमाणात नुकसान झालं असून सुदैवाने सर्वच प्रवासी सुखरुप आहेत. हावडा-पुरी-हावडा मार्गावरील वंदे भारत ट्रेनची विंडो स्क्रीन वादळी वाऱ्याच्या तडाख्यात सापडल्याने मोडकळीस आली आहे. त्यामुळे, रेल्वे विभागाने आजच्या दिवसासाठी ही ट्रेन रद्द केली आहे.
ओडिशामधील भद्रक रेल्वे स्टेशनच्या प्रबंधकाने सांगितले की, वादळी वारा आणि विजांचा कडकडाट सुरू असताना वंदे भारत ट्रेनला हादरा बसला. त्यामध्ये, ड्रायव्हर केबिनच्या समोरील आरसे आणि खिडकीच्या काचा खराब झाल्या आहेत. तसेच, लाईट सेवाही विस्कळीत झाली आहे. सुदैवाने या दुर्घटनेत कुठल्याही प्रवाशाला ईजा पोहोचली नाही. दुलखापटना-मंजुरी रेल्वे स्थानकावर ट्रेन असताना ही घटना घडली.
दरम्यान, हावडा-पुरी-हावडा रेल्वे मार्गावर वंदे भारत ट्रेन सुरू करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी १८ मे रोजी हिरवा झेंडा दाखवत ही रेल्वेसेवा सुरू केली. त्याच्या दोनच दिवसानंतर ही रेल्वेसेवा प्रवाशांसाठी सुरू करण्यात आली. ही देशातील १६ वी आणि ओडिशातील पहिली वंदे भारत ट्रेन आहे. जी पवित्र शहर असलेल्या पुरीला थेट पश्चिम बंगालच्या हावडा स्टेशनशी जोडते.