उत्तर प्रदेशातील वाराणसीमध्ये पावसामुळे एक लहान मुलगा रस्त्यावरील पाण्यामध्ये पडला. पण दुर्दैवाने त्या पाण्यातून विजेचा प्रवाह जात होता. शॉक बसताच मुलगा तडफडू लागला. याच दरम्यान एका वृद्ध व्यक्तीने प्रसंगावधान दाखवून चिमुकल्याचा जीव वाचवला आहे. यावेळी घटनास्थळी उपस्थित असलेले लोक हा सर्व प्रकार पाहत होते. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. मुलाचा जीव वाचवणाऱ्या वृद्ध व्यक्तीचं भरभरून कौतुक केलं जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हे प्रकरण वाराणसीच्या चेतगंज पोलीस ठाण्याच्या हबीबपुरा परिसरातील आहे. या घटनेशी संबंधित व्हिडिओमध्ये पावसामुळे रस्त्यावर पाणी तुंबल्याचे दिसत आहे. त्या ठिकाणी विजेचा खांबही होता, ज्यातून विजेचा प्रवाह पाण्यामध्ये देखील आला होता. एक चिमुकला शॉक लागल्याने पाण्यात पडला. त्याचवेळी रस्त्यावरून प्रवासी घेऊन जाणारी एक ई-रिक्षा गेली.
मुलाला विजेचा शॉक लागल्याचे पाहून लोकांनी रिक्षा थांबवली. एका वृद्धाने पुढे येऊन मुलाला वाचवण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यालाही विजेचा शॉक बसला. यामुळे तो मागे पडला. याच दरम्यान आणखी एका वृद्धाने हाताने खुणावत रस्त्यावरील वाहतूक थांबवली. वृद्धाने एका व्यक्तीकडे काठी मागितली आणि पुन्हा काठीच्या सहाय्याने मुलाला वाचवण्याचा प्रयत्न केला.
व्यक्तीने काठी मुलाच्या दिशेने पुढे गेली पण मुलाला ती नीट पकडता आली नाही. त्यानंतर पुन्हा प्रयत्न केला. तेव्हा मुलाने काठी पकडली आणि मुलाचा जीव वाचवला. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून ती सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. लोकं या वृद्ध व्यक्तीचं कौतुक करत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.