वाराणसी-
फॅन्स नंबरप्लेट वापरुन बडेजावपणा करणं किती महागात पडू शकतं याचं उदाहरण उत्तर प्रदेशातील वाराणसी येथे समोर आलं आहे. वाराणसीमध्ये एका फॉर्च्युनर कार चालकानं त्याच्या नंबर प्लेटमध्ये नंबर ऐवजी 'ठाकुर' लिहिलं होतं. तसंच कारच्या काचेवर पोलीस लिहिलेला स्टिकर चिटकवला होता. पोलिसांनी रोखलं असता कार चालक थेट पोलिसांशी वाद घालू लागला आणि अरेरावी करू लागला. मग काय पोलिसांनी खाकी इंगा दाखवत कार चालकाला २८ हजार ५०० रुपयांचा दंड तर ठोठावलाच, पण कारही जप्त केली आहे.
वाराणसीच्या केंट ठाणे हद्दीच्या अंतर्गत एका फॉर्च्युनर कारवर नंबरऐवजी 'ठाकुर' शब्द लिहिण्यात आला होता. या कारचा व्हिडिओ देखील सोशल मीडियात खूप व्हायरल झाला होता. पोलिसांनी याची माहिती घेतली आणि नाकाबंदीवेळी कारला अडवलं. पोलिसांनी रोखलं असता कार चालक पोलिसांशी हुज्जत घालू लागला. त्यानंतर पोलिसांनी कायदेशीर कारवाई करत कार चालकाला दंड ठोठावला व त्याची कारही जप्त केली आहे. संबंधित कारचा मालक नेमका कोण आहे याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.
लोक आपल्या कार किंवा बाईकच्या नंबर प्लेटमध्ये नंबर ऐवजी एखाद्याचं नाव किंवा आपल्या जातीचा उल्लेख करत असल्याची अनेक उदाहरणं याआधीही आपण पाहिली आहेत. पोलिसांकडून अशा वाहनांवर वेळोवेळी कारवाईचा बडगा देखील उगारला जातो. तरीही अशी प्रकरणं अजूनही काही थांबताना दिसत नाहीत.