ज्ञानवापी मशिदीसंदर्भात (Gyanvapi Mosque) आज (शुक्रवारी) दुपारी 3 वाजता सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) सुनावणी होणार आहे. दरम्यान, अंजुमन इंतजामिया मशीद कमिटीने (Anjuman Intizamia Masjid Committee) लोकांनी मशिदीत अधिक गर्दी करू नये असे म्हटले आहे. कारण वुझुखाना सील करण्यात आला आहे. आज शुक्रवारच्या नमाजसाठी मोठ्या संख्येने लोक मशिदीत येण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती.
मोठ्या संख्येने मशिदीत न येण्याचं आवाहन - ज्ञानवापी प्रकरणामुळे वझुखाना सील करण्यात आला आहे. यामुळे आज शुक्रवारच्या नमाज पठनासाठी मशिदीत मोठ्या संख्येने येऊ नये, असे आवाहन अंजुमन इंतजामिया मशीद कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे.
अंजुमन इंतजामिया मशीद कमिटीनं जारी केलं पत्र - यासंदर्भात अंजुमन इंतजामिया मशीद कमिटीने एक पत्र जारी केले आहे. यात, "सर्वांनाच माहीत आहे, की शाही जामा मशीद ज्ञानवापी वाराणसीचे प्रकरण सध्या वाराणसी न्यायालयाशिवाय, सर्वोच्च न्यायालयात सुरू आहे. न्यायालयाच्या निर्णयानंतर, जामा मशिदीचा वझुखाना आणि शौचालय सील करण्यात आले आहे. या प्रकरणी मार्ग काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अल्लाहच्या कृपेने या समस्येवर लवकरात लवकर तोडगा निघावा," असे म्हणण्यात आले आहे.
अपापल्या परिसरातच करावे शुक्रवारचे नमाज पठण -याशिवाय, "वुझुखाना आणि शौचालय सील करण्यात आल्याने, वुझू आणि शौचालयाची समस्या निर्माण झाली आहे. तसेच, शुक्रवारच्या नमाजसाठी मोठ्या प्रमाणावर लोक येतात. यामुळे ही समस्या अधिक वाढेल. यामुळे, लोकांना आवाहन करण्यात येते, की त्यांनी मोठ्या प्रमाणावर येणे टाळावे आणि नेहमी प्रमाणेच आजही आपापल्या परिसरात नमाज पठण करावे. तसेच, जे लोक नमाज पठणासाठी येणार असतील त्यांनी शौचालय आणि वुझू करून यावे, असेही अंजुमन इंतजामिया मशीद कमिटीच्या पत्रात म्हणण्यात आले आहे.