वाराणसी-
ज्या लिंबाचा वापर इतरांवरील अडथळे किंवा त्रास दूर करण्यासाठी तंत्रपूजेत केला जातो, त्याच लिंबाच्या वाढत्या किमतींवर नियंत्रण ठेवण्यासाठी आता लिंबाचाच बळी दिला जात आहे. उत्तर प्रदेशातील वाराणसीमध्ये लिंबाच्या वाढत्या किमतीमुळे हैराण झालेल्या भगतसिंग युवा ब्रिगेडने आदिशक्ती मंदिरात तंत्रपूजा करताना लिंबाचा बळी दिला.
"जेव्हा सरकारची धोरणे फसतात, प्रशासकीय कर्मचारीही अपयशी होतात आणि निराश होतात, तेव्हा आपण माता राणीच्या आश्रयाला जातो. रविवारी आणि मंगळवारी तंत्रपूजा केली जाते", असं भगतसिंग युवा आघाडीचे अध्यक्ष आणि तंत्राचे उपासक हरीश मिश्रा म्हणाले.
लिंबाचा भाव गगनाला भिडला असून तंत्र पूजेचा मुख्य घटक लिंबूच आहे. लिंबूच्या दरवाढीचा उद्रेक सर्व घराघरांत पोहोचला आहे. गेल्या महिनाभरापासून लिंबाच्या किमतीत सातत्याने वाढ होत आहे, त्यामुळे लिंबू खरेदी करणं देखील आता सर्वसामान्यांच्या आवक्याबाहेर जाऊ लागलं आहे, असं हरीश मिश्रा म्हणाले.
"एक लिंबू तब्बल १५ रुपयांना मिळत आहे आणि सरकार यावर काहीच बोलायला तयार नाही. सरकार लिंबूचा काळा बाजार करणाऱ्यांसमोर शरण गेलं आहे. अशा बिकट स्थितीत माँ भगवतीच आमच्या सर्वांचा सहारा आहे", असंही मिश्रा म्हणाले.
भगवती देवीसमोर लिंबाचा बली देऊन तंत्र पूजा करण्यात आली आणि येत्या २ ते ३ दिवसांत लिंबाचे दर कमी होऊ देत अशी प्रार्थना करण्यात आली. तसंच या पुजेनंतर लिंबू स्वस्त होतील असा दावा मिश्रा यांनी केला आहे.