नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी (17 सप्टेंबर ) आपला 69 वा वाढदिवस साजरा करत आहेत. मोदींच्या वाढदिवसानिमित्त देशभरात विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. भाजपाकडूनही वाढदिवसाची जंगी तयारी करण्यात आली आहे. पंतप्रधान मोदी हे त्यांच्या मातोश्री हिराबेन यांचा आशीर्वाद घेण्यासाठी घरी जाणार आहेत. तसेच मोदी आज नर्मदा जिल्ह्यातील सरदार सरोवर बंधाऱ्याची पाहणी करतील. मोदींच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या एका चाहत्याने वाराणसी येथील संकटमोचक मंदिरात हनुमानाला सोन्याचा मुकुट अर्पण केला आहे.
अरविंद सिंह यांनी संकटमोचक हनुमानाला पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त सोन्याचा मुकुट अर्पण केला आहे. मोदींचे दुसऱ्यांदा सरकार आले तर हनुमानाला 1.25 किलोचा सोन्याचा मुकुट देणार असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. त्यानुसार अरविंद सिंह यांनी संकटमोचक मंदिरात सोन्याचा मुकुट अर्पण केला आहे. दिल्ली भाजपाचे अध्यक्ष मनोज तिवारी यांनी आपल्या समर्थकांसह पंतप्रधान मोदी यांचा वाढदिवस इंडिया गेटवर साजरा केला. इंडिया गेटवर एक स्पेशल केक कापण्यात आला. तसेच पंतप्रधान मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.
भारतीय जनता पार्टीकडूनही नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त विशेष कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे. पुढील आठवडाभर देशभरात विविध कार्यक्रम राबविले जातील. यात पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहांसह अन्य पदाधिकारीही उपस्थित राहतील. या कार्यक्रमात स्वच्छता अभियान आणि रक्तदान शिबीर आयोजित करण्यात येणार आहे. पहिल्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या आई हिराबेन यांची भेट घेतील. त्यानंतर केवाडिया येथील कार्यक्रमाला पोहचतील. हे ठिकाण नर्मदा जिल्ह्यात येते. याठिकाणी ते नर्मदा पूजा होईल त्यात पंतप्रधान मोदी सहभागी होतील. पुजेनंतर नरेंद्र मोदी उपस्थित जनसमुदायाला संबोधित करतील. ही जनसभा सकाळी 11 ते 12 च्या दरम्यान होईल.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याआधी नर्मदा जिल्ह्यातील सरदार सरोवर धरणाला तिरंग्याच्या रंगात विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. येथे बांधण्यात आलेल्या बंधाऱ्याचं उद्धाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. मोदी यांच्या दौऱ्याबाबत गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपाणी यांनी ट्विट करुन आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त केवाडिया येथे होणाऱ्या नमामि देवी नर्मदा महोत्सवात त्यांचे स्वागत केले आहे.
सूरत येथील ब्रेडलाइनर बेकरीच्या मालकाने मोदींचा वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा करण्याचं ठरविलं आहे. मोदींच्या वाढदिवसानिमित्त 7 हजार किलो आणि 700 फूट लांब असा केक कापून पंतप्रधान मोदींचा वाढदिवस साजरा करण्यात येणार आहे. सूरत येथील सरसाना कन्वेंशन सेंटरमध्ये 700 प्रामाणिक लोकांकडून हा केक कापण्यात येणार आहे. ब्रेडलाइनर बेकरीचे मालक नितीन पटेल यांनी सांगितलं की, हा केक जगातील सर्वात मोठा केक असणार आहे. याची नोंद वर्ल्ड रेकॉर्डमध्ये घेतली जाईल. भ्रष्टाचाराविरोधात लोकांमध्ये जागरुकता आणण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवशी हा केक कापण्यात येणार आहे. यावेळी नरेंद्र मोदी यांचे चाहते मोठ्या संख्येने उपस्थित राहतील अशी अपेक्षा आहे. दरवर्षी ब्रेडलाइनर बेकरी मोदींचा वाढदिवस मोठा केक कापून साजरा करतो, हा केक गरीब मुलांमध्ये वाटला जातो.