नवी दिल्लीः पंतप्रधान नरेंद्र मोदींनीवाराणसीच्या मतदारसंघातून आज उमेदवारी अर्ज भरला आहे. गुरुवारी आयोजित केलेल्या ऐतिहासिक रोड शोमध्ये काशीच्या जनसभेला संबोधित केलं आणि त्यांच्याकडे उमेदवारी अर्ज भरण्याची परवानगी मागितली होती. गेल्या वेळीसारखेच यंदाही मोदींचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी 4 सूचक उपस्थित होते. मोदींनी उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी कालभैरवाचंही दर्शन घेतलं होतं. यावेळी मोदींच्या उमेदवारी अर्ज भरण्यासाठी सूचकांमध्ये डोमराजांच्या परिवारापासून चौकीदाराचा समावेश होता.यंदा डोमराजाच्या परिवाराचा एक सदस्य मोदींचा सूचक झाला होता. तसेच पटेल धर्मशाळेचे रामशंकर पटेलही उमेदवारी अर्ज भरणाऱ्या मोदींचे सूचक राहिले आहेत. पंतप्रधान मोदींच्या दोन अन्य सूचकांमध्ये पाणिनी कन्या महाविद्यालयाचे प्राचार्य अन्नपूर्णा शुक्ला आणि एका चौकीदाराचा समावेश आहे. सूचकांद्वारे मोदी सर्व समाजाचं प्रतिनिधित्व करतात हे दाखवू इच्छितात. उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी मोदींनी शुक्ला यांचे चरण स्पर्श करून आशीर्वाद घेतले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज वाराणसी मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. मोदींचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी दिवस, तारीख आणि योग जुळून यावा, यासाठी काशीच्या पंडितांनी शुभ मुहूर्त काढला होता. 26 एप्रिलला शुभ मुहूर्तावर मोदींनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.दरम्यान गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाराणसीमध्ये भव्य रोड शो काढून शक्तिप्रदर्शन केलं. बनारस हिंदू विद्यापीठाजवळील पंडित मदनमोहन मालवीय यांच्या पुतळ्याला अभिवादन करत मोदींच्या रोड शोची सुरुवात झाली. मोदींच्या रोड शोसाठी वाराणसीमध्ये भाजपाच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.सुमारे सात किलोमीटरच्या रोड शोच्या माध्यमातून मोदी आणि भाजपाने जोरदार शक्तिप्रदर्शन केले. रोड शो समाप्त झाल्यानंतर नरेंद्र मोदींनी गंगा आरतीला उपस्थिती लावत गंगा आरती केली.यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत भाजपाचे अध्यक्ष अमित शहा आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ उपस्थित होते. गंगा आरतीसाठी वाराणसीतील घाटांवर आकर्षक सजावट देखील करण्यात आली होती.
वाराणसीच्या राजघराण्याचे वारसदार ते चौकीदार; 'हे' आहेत मोदींचे सूचक
By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2019 12:59 PM