नवी दिल्ली- जम्मू-काश्मीरमधल्या पुलवामा दहशतवादी हल्ल्यात 38 जवानांना वीरमरण आलं आहे. अनेक जवान सुट्टीवरून परतत असताना हा दहशतवादी हल्ला करण्यात आला. काश्मीरमधल्या पुलवामामध्ये शहीद झालेल्या 38 जवानांमध्ये उत्तर प्रदेशातल्या चंदोलीच्या अवधेश कुमार यादव याचाही समावेश आहे. अवधेश यादव 45व्या बटालियनमध्ये तैनात होते. शहीद अवधेश यादव यांची आई कॅन्सर पीडित आहे. अवधेश यांच्या आईला मुलगा देशासाठी शहीद झालाय हे अद्यापही माहीत नाही. अजूनही ती मुलाच्या वाटेकडे डोळे लावून बसली आहे.शेजाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, घरच्या महिलांनी अद्यापही त्या जवानाच्या आईला यासंदर्भात काहीही माहिती दिलेली नाही. त्या जवानाची आई कॅन्सरनं ग्रस्त आहे. त्यामुळे तिला ही घटना सांगण्याची कोणाचीही हिंमत होत नाहीये. अवधेश शहीद झाल्याची सूचना मिळाल्यानंतर गावात शोकाकुल वातावरण आहे. अवधेश मुगलसराय कोतवालीच्या बहादूरपूर गावात वास्तव्याला होता. परंतु त्या जवानाच्या घरच्यांना अधिकृतरीत्या कोणतीही माहिती मिळालेली नाही. परंतु गावात अवधेश शहीद झाल्याची चर्चा आहे. त्यामुळे पूर्ण गावात स्मशानशांतता पसरली आहे. अवधेश यादव सुट्टीच्या काळात घरी आले होते. 2 दिवसांपूर्वीच ते 12 फेब्रुवारीला कामावर पुन्हा रुजू झाले.काश्मीरमध्ये तैनात असलेल्या कमांडो वेद प्रकाश याने अवधेश शहीद झाल्याची माहिती दिली. अवधेश यादव 2010ला लष्करात भरती झाले होते. नोकरीच्या 4 वर्षांनंतर त्यांनी 2014ला शिल्पी यादव हिच्याशी लग्न केले. अवधेशला एक दोन वर्षांचा निखिल नावाचा मुलगा आहे. अवधेश यादव हे सीआरपीएफच्या 45व्या बटालियनमध्ये रेडिओ ऑपरेटरपदावर कार्यरत आहेत. शहीद अवधेशच्या वडिलांचं नाव हरिकेश यादव असून, आई कॅन्सर या आजारानं ग्रस्त आहे. आईचं नाव मालती देवी आहे, तर भाऊ बृजेश यादव, बहीण पूनम आणि नीलम यांचा अश्रूंना पारावर उरला नाहीये.
Pulwama Attack: कॅन्सरग्रस्त आई पाहतेय मुलाची वाट; पुलवामा हल्ल्यात 'तो' झालाय शहीद
By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2019 3:54 PM