Varun Gandhi speech in Maneka Gandhi Election Campaign: भाजपाचे पिलीभीतचे माजी खासदार वरुण गांधी यांचे या निवडणुकीला तिकीट कापण्यात आले. केंद्र सरकारच्या काही निर्णयांवर आणि योजनांवर टीका केल्याने पक्षश्रेष्ठींनी हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर लोकसभेच्या निवडणुकींचे पाच टप्पे पूर्ण झाले, तसेच मनेका गांधी यांचा सुलतानपूरमध्ये प्रचार सुरु झाला, पण वरुण गांधी कुठेही दिसत नव्हते. मनेका गांधी यांनी नुकतेच एका सभेत सांगितले होते की २३ मे पासून वरुण गांधी प्रचाराला सुरुवात करतील. त्यानुसार, अखेर आजपासून वरुण गांधी प्रचारप्रक्रियेत 'अॅक्टिव्ह' झाल्याचे दिसले. आपल्या मातोश्री मनेका गांधी यांच्या प्रचारसभेत बोलताना वरुण गांधींनी अनेक महत्त्वाचे मुद्दे मांडले. पण महत्त्वाचा भाग म्हणजे त्यांच्या भाषणात त्यांनी पंतप्रधान मोदी आणि भाजपाचा अजिबात उल्लेख केला नाही.
वरुण गांधी यांनी आज सुलतानपूर लोकसभा मतदारसंघात निवडणूक रॅलीला संबोधित केले आणि त्यांच्या आई मनेका गांधी यांच्यासाठी मते मागितली. वरुण म्हणाले, "देशभर निवडणुका होत आहेत पण देशात केवळ हे एकच मतदारसंघ क्षेत्र असे आहे की जिथे त्यांच्या नेत्याला कोणीही खासदार किंवा मंत्रीजी म्हणत नाहीत, तर लोक त्यांना माता जी म्हणतात." आई कधीच आपल्याला मुलाची साथ सोडत नाही. म्हणूनच आज मी केवळ माझ्या आईसाठी नव्हे तर संबंध सुलतानपूरच्या माताजींसाठी तुमचा जनाधार मागण्यासाठी आलो आहे. मी पहिल्यांदा सुलतानपूरला आलो तेव्हा मला इथे पित्यासारखं प्रेम मिळालं. पण आता मला इथल्या मातीत आईसारखी माया मिळते हे मी हक्काने सांगू शकतो. कारण आज सुलतानपूर हे मनेका गांधी या नावाने ओळखले जाते."
"जेव्हा इथले लोक बाहेर जातात आणि सुलतानपूरचे नाव सांगतात तेव्हा लोक विचारतात की, मनेका गांधी वाले सुल्तानपूर का? सुलतानपूरला एका खासदाराची गरज आहे जो जनतेला आपले कुटुंब समजतो. पिलीभीतमध्ये ज्याप्रमाणे वरुण गांधींचा नंबर प्रत्येकाकडे आहे, त्याचप्रमाणे सुलतानपूरमध्ये माझी आई रात्रीबेरात्री फोन उचलते आणि सर्वांना मदत करते. त्यामुळे तुम्ही सर्वांनी मनेका गांधी यांनाच मोठ्या संख्येने मतदान करा," असे तो म्हणाला.
वरुण गांधींच्या भाषणात भाजपा, मोदींचा उल्लेखही नाही!
वरुण गांधी सभेला आले तेव्हा त्यांनी भाजपाचा गमछा घालणे टाळले. त्यांनी गळ्याभोवती गुंडाळलेल्या गमछावर 'राधे राधे' असे शब्द लिहिले होते. तसेच वरुण गांधी यांनी भाषणादरम्यान एकदाही पंतप्रधान मोदी किंवा भारतीय जनता पक्षाचे नाव घेतले नाही. त्यांनी फक्त त्यांचे वडील, त्यांची आई मनेका गांधी आणि विकासकामे यांचाच उल्लेख केला. या लोकसभा निवडणुकीत वरुण गांधी यांचे तिकीट भारतीय जनता पक्षाने रद्द केले. त्यांच्या जागी भाजपने काँग्रेसमधून भाजपामध्ये आलेल्या जितिन प्रसाद यांना उमेदवारी दिली आहे. त्याबाबतचा रोष वरुण यांच्या भाषणातून स्पष्ट दिसून आला.