लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : भाजपच्या प्रमुख युवक नेत्यांपैकी एक वरूण गांधी गेल्या काही दिवसांपासून पक्षावर नाराज असून, ते केंद्र सरकारने घेतलेले निर्णय, तसेच पक्ष धोरणांविरोधात सातत्याने आणि जाहीरपणे टीका करत आहेत. या पार्श्वभूमीवर वरूण गांधी लवकरच तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारकडून सुरू असलेल्या खासगीकरणावरही त्यांनी टीका केली आहे.
वरूण गांधी यांनी पिलभीत येथील गांधी सभागृहात व्यापाऱ्यांशी संवाद साधताना खासगीकरणामुळे कोट्यवधी लोकांचा रोजगार धोक्यात असल्याचे म्हटले आणि खासगीकरणाच्या नावावर सगळे विकले चालले आहे. हा सरकारचा मोठा डाव असल्याचे ते म्हणाले. खासगीकरण आणि ई-कॉमर्सच्या माध्यमातून होत असलेल्या सर्वच आर्थिक व्यवहारांमुळे देशाची अर्थव्यवस्था धोक्यात आली आहे. प्रत्येक गोष्टीला फायद्याच्या तराजूत मोजणे योग्य नाही. सरकारी नोकरी देण्याऐवजी नोकऱ्या काढून घ्यायचे काम करत आहे. त्यामुळेच आजचा तरुण रोजगाराच्या शोधात भटकतो आहे. माझ्यासाठी देश सर्वप्रथम असून राजकारण नंतर, देशासाठी काहीही करायची माझी तयारी आहे, असे गांधी म्हणाले.
मंत्रिमंडळात डावलल्याने नाराज...
- केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारात स्थान न मिळाल्याने वरुण गांधी नाराज असल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच भाजपच्या कार्यकारिणीमधूनही वरुण गांधी आणि त्यांची आई मनेका गांधी यांना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला.
- तेव्हापासून वरुण गांधी भाजपविरोधात अधिकच आक्रमक झाले आहेत. त्यांनी गेल्या काही दिवसांमध्ये योगी आदित्यनाथ यांच्या सरकारवर लखीमपूर हिंसेवरून चौफैर टीका केली होती.