पीलीभीतचे खासदार वरुण गांधी यांनी त्यांच्या मतदारसंघातील लोकांना एक भावनिक पत्र लिहिलं आहे. वरुण गांधी यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. त्यांनी आपल्या पत्रात सुरुवातीपासूनच्या सर्व गोष्टींचा उल्लेख केला आहे. जनतेशी असलेल्या नात्यावर भाष्य केलं आहे. सर्वसामान्यांचा आवाज बुलंद करण्यासाठी आपण राजकारणात आलो आहोत आणि कितीही किंमत मोजावी लागली तरी हे कार्य सदैव करत राहावे यासाठी मी तुमचा आशीर्वाद घेतो, असे त्यांनी पत्रात स्पष्टपणे नमूद केलं आहे.
वरुण गांधी यांनी पत्राच्या सुरुवातीला लिहिलं आहे की, "आज जेव्हा मी हे पत्र लिहित आहे, तेव्हा असंख्य आठवणींनी मला भावूक केले आहे. मला आठवतंय, तीन वर्षाचा लहान मुलगा 1983 मध्ये पहिल्यांदा आईचं बोट धरून पीलीभीतला आला होता. तीन वर्षांच्या मुलाला कुठे माहीत होतं की, हेच ठिकाण त्याची कर्मभूमी असेल आणि येथील लोक त्यांचे कुटुंब बनतील. मी स्वत:ला भाग्यवान समजतो की, मला पीलीभीतच्या महान लोकांची गेल्या अनेक वर्षांपासून सेवा करण्याची संधी मिळाली."
"पीलीभीतशी माझे नाते शेवटच्या श्वासापर्यंत संपू शकत नाही"
"पीलीभीतमधून मिळालेले आदर्श, साधेपणा आणि दयाळूपणा यांनी केवळ खासदार म्हणूनच नव्हे तर एक व्यक्ती म्हणूनही माझ्या संगोपन आणि विकासात मोठा हातभार लावला आहे. तुमचा प्रतिनिधी असणे आणि तुमच्या हितासाठी नेहमी माझ्या क्षमतेनुसार बोलणे हा माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा सन्मान आहे. माझा खासदारपदाचा कार्यकाळ संपत असला, तरी पीलीभीतशी माझे नाते शेवटच्या श्वासापर्यंत संपू शकत नाही."
"मी तुमचा होतो, आहे आणि राहणार"
"खासदार म्हणून नाही तर मुलगा म्हणून आयुष्यभर तुमची सेवा करण्यास मी कटिबद्ध आहे. पीलीभीतच्या लोकांसाठी दरवाजे पूर्वीप्रमाणेच सदैव उघडे राहतील. मी आणि पीलीभीतमधील नातं हे प्रेम आणि विश्वासाचे आहे जे कोणत्याही राजकीय गुणवत्तेपेक्षा खूप वरचं आहे. मी तुमचा होतो, आहे आणि राहणार" असं देखील वरुण गांधी यांनी आपल्या पत्रामध्ये म्हटलं आहे.