लखनौ : लोकसभेच्या उत्तर प्रदेशातील हाय-प्रोफाईल जागांपैकी एक असलेल्या रायबरेली या जागेवरून अद्याप काँग्रेस आणि भाजपाने आपले पत्ते उघड केलेले नाहीत. प्रियांका गांधी रायबरेलीतून निवडणूक लढवणार असल्याचे काँग्रेसकडून सांगण्यात येत आहे. तर दुसरीकडे, भाजपाने प्रियांका गांधी यांच्याविरोधात वरुण गांधी यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतल्याचे म्हटले जात आहे.
भाजपाने वरुण गांधींना रायबरेलीमधून निवडणूक लढवण्याची ऑफर दिली आहे, असे पक्षाच्या सूत्रांनी सांगितले आहे. सूत्रांच्या म्हणण्यानुसार, वरुण गांधी यांनी आपली चुलत बहीण प्रियांका गांधी यांच्या विरोधात निवडणूक लढवण्याच्या निर्णयावर विचार करण्यासाठी वेळ मागितला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाने रायबरेलीच्या उमेदवारांच्या पॅनेलमध्ये वरुण गांधी यांच्या नावाचाही समावेश केला आहे.
रायबरेली ही जागा काँग्रेसचा बालेकिल्ला मानली जाते. या जागेवरून काँग्रेसकडून सोनिया गांधी निवडणूक लढवत होत्या. मात्र, यावेळी सोनिया गांधी राज्यसभेवर गेल्यामुळे प्रियांका गांधी येथून निवडणूक लढवणार असल्याची चर्चा रंगली आहे. अशा स्थितीत वरुण गांधी निवडणुकीच्या रिंगणात उतरले तर पक्ष निवडणूक लढवण्यास मजबूत स्थितीत असेल, असे भाजपाच्या अंतर्गत सर्वेक्षणातून समोर आले आहे. त्यानंतर वरुण गांधी यांना उमेदवारी देण्याचे प्रयत्न तीव्र झाले आहेत. एक-दोन दिवसांत वरुण गांधी आपला निर्णय जाहीर करतील, असे सांगण्यात येत आहे.
वरुण गांधी यांनी रायबरेलीतून निवडणूक लढवल्यास 40 वर्षांनंतर गांधी घराण्यातील सदस्य एकमेकांविरुद्ध निवडणूक लढवतील. 1984 च्या लोकसभा निवडणुकीत वरुण गांधी यांच्या आई मनेका गांधी यांनी अमेठीतून राजीव गांधी यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती. त्यावेळी त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. त्यानंतर मेनका गांधी आणि सोनिया गांधी यांच्या कुटुंबीयांनी कधीही एकमेकांच्या विरोधात निवडणुक लढवली नव्हती.
विशेष म्हणजे, यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भाजपाने पिलीभीतमधून वरुण गांधी यांचे तिकीट रद्द केले आहे. त्यामुळे आता त्यांना रायबरेलीतून उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तविली जात आहे. तर मनेका गांधींना पुन्हा एकदा सुलतानपूरमधून उमेदवारी देण्यात आली आहे.