जीवनात काही नवीन करण्याची जिद्द असेल तर कोणीच तुम्हाला तुमच्या ध्येयापासून रोखू शकत नाही, असे नेहमी बोललं जातं. किंबहुना वडिलधारी मंडळी मुला-बाळांसमोर असे धडे गिरवत असतात. जिद्द, चिकाटी आणि मेहनत माणसाला काय बनवू शकते याचा प्रत्यय एका दृष्टीहीन प्राध्यापकाकडे पाहून येतो... राजस्थानमधील भीलवाडा येथील एका अंध शिक्षकाचे कार्य अनेकांसाठी प्रेरणा आहे. भीलवाडा येथील सरकारी शाळेत कार्यरत असलेल्या वसंत कुमार यांनी जिद्दीच्या जोरावर यशाचे शिखर गाठले. एवढेच नाही तर ते स्वत: पाहू शकत नसले तरी विद्यार्थ्यांच्या जीवनात प्रकाश टाकण्याचे काम ते करत आहेत. खरं तर वयाच्या अवघ्या पाचव्या वर्षी त्यांची दृष्टी गेली होती.
दरम्यान, दृष्टीहीन झाल्यानंतर जवळपास १८ वर्ष आपल्या कुटुंबापासून दूर राहून त्यांनी सरकारी शाळेत शिक्षण होण्याचा मान पटकावला. आता ते मेहनतीच्या जोरावर या शाळेचे प्राध्यापक देखील झाले आहेत. त्यांचा इथपर्यंतचा प्रवास अत्यंत खडतर, संघर्षमय होता, जो आज अनेकांसाठी प्रेरणा आहे. भीलवाडा शहरातील माध्यमिक विद्यालय गांधीनगरचे प्राध्यापक वसंत कुमार यांनी सांगितले की, त्यांची दृष्टी गेली असल्याचे त्यांना वयाच्या पाचव्या वर्षी समजले.
दृष्टीहीन असल्याने वाटेत समस्यांचा डोंगर वसंत कुमार सांगतात की, दृष्टी गेल्याचे कळताच वडिलांच्या एका मित्राच्या सल्ल्यानुसार माझ्यासारख्यांसाठी असलेल्या शाळेत मला पाठवण्यात आले. माझे वडीलही शिक्षक असल्याने त्यांनी मला शिक्षणापासून कधी वंचित ठेवले नाही. त्यामुळे भीलवाडा शहराबाहेरील शाळेत मला ठेवण्यात आले. १८ वर्ष कुटुंबीयांपासून लांब राहून वेगवेगळ्या भागांत शिक्षण घेतले. आजच्या घडीला संस्कृत विषयाचा शिक्षक म्हणून कार्यरत आहे. इथपर्यंत पोहचण्यासाठी अनेक समस्यांचा सामना करावा लागला, अनेक ठेचा खाल्ल्या. दृष्टीहीन असताना देखील स्वप्नांकडे धाव घेत इथपर्यंत मजल मारली.
कधीच हार मानली नाही...दरम्यान, आपल्या जीवनातील संघर्ष सांगत वसंत मुलांना धडे देतात. यातूनच विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळत असल्याचे ते सांगतात. 'मी एक अंध व्यक्ती असताना देखील मेहनती केली अन् शिक्षक बनलो', हे माझं वाक्य विद्यार्थ्यांना सांगत सांगत मी त्यांच्या जीवनात प्रकाश टाकण्याचे काम करतो. तसेच 'अगर किसी भी चीज को सच्चे दिल से चाहो और मेहनत करो तो सफलता हासिल हो ही जाती है', अशा शब्दांत वसंत कुमार यांनी त्यांच्या यशाचे रहस्य थोडक्यात सांगितले.