पटना : प्रसिद्ध गणिततज्ज्ञ वसिष्ठ नारायण सिंह यांचे गुरुवारी निधन झाले. ते 74 वर्षांचे होते. वसिष्ठ नारायण सिंह हे गेल्या 40 वर्षांपासून सिजोफ्रेनिया या मानसिक आजाराने ग्रस्त होते.
गेल्या काही दिवसांपासून त्यांची तब्येत खालावली होती. त्यामुळे उपचारांसाठी त्यांना येथील पटना मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान गुरुवारी त्यांची प्राणज्योत मालवली.
वसिष्ठ नारायण सिंह हे गणितातले दिग्गज होते. त्यांना लोक गणित विषयामधील देव मानत तर गणिताचे शिक्षक, प्राध्यापक त्यांना गणिताचे जादुगार म्हणत होते. गणित सोपे करण्यासाठी त्यांनी अनेक सिद्धांत मांडले आहेत. त्यांच्या जन्म 2 एप्रिल 1942 रोजी बिहारच्या भोजपूर जिल्ह्यातील बसंतपूर या गावात झाला होता.
दरम्यान, वसिष्ठ नारायण सिंह यांच्या निधनाचे वृत्त समजताच राज्यात शोककळा पसरली आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यासह अनेक दिग्गजांनी वसिष्ठ नारायण सिंह यांना श्रद्धांजली वाहिली आहे.